news
‘शहराच्या विकासापेक्षा राजकीय तडजोडी आणि सोयीचे राजकारण’; २० नोव्हेंबरच्या तिन्ही सर्वसाधारण सभांकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष!‘प्रत्येक पात्र फेरीवाल्याला कायदेशीर संरक्षण आणि सन्मानाने व्यवसाय करण्याचा अधिकार मिळवून देणार’; कामगार नेते काशिनाथ नखाते यांची ग्वाही!‘दिवाळीच्या सुट्टीत उभारलेल्या अनधिकृत बांधकामांची होणार झाडाझडती’; पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा आक्रमक पवित्रा!‘करदात्या नागरिकांच्या हक्काची कोट्यवधींची जमीन लाटण्याचा प्रकार खपवून घेणार नाही’; मारुती भापकर यांचा महापौर व आयुक्तांना इशारा!‘लहान मुले व ज्येष्ठांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; भटक्या श्वानांच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष चालणार नाही’; उपमहापौर बाबर आक्रमक!
Home पिंपरी चिंचवड ‘लहान मुले व ज्येष्ठांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; भटक्या श्वानांच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष चालणार नाही’; उपमहापौर बाबर आक्रमक!

‘लहान मुले व ज्येष्ठांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; भटक्या श्वानांच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष चालणार नाही’; उपमहापौर बाबर आक्रमक!

लसीकरण व नसबंदी मोहिमेला वेग देण्याचे आदेश; मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे व अधिकाऱ्यांसमवेत निवारा केंद्राचा सविस्तर आढावा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भटक्या श्वानांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा; उपमहापौर शर्मिला बाबर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १८ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: शहरातील वाढत्या भटक्या श्वानांच्या उपद्रवामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेत उपमहापौर शर्मिला बाबर यांनी गवळीमाथा रोड, पिंपरी येथील श्वान निवारा केंद्र आणि पशु इस्पितळाला अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी निवारा केंद्रातील व्यवस्था, श्वानांचे लसीकरण, नसबंदी तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत या समस्येवर तातडीने आणि नियोजनबद्ध उपाययोजना करण्याचे सक्त निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील विविध भागांतून भटक्या श्वानांच्या त्रासाबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या समस्येकडे दुर्लक्ष चालणार नाही. यापूर्वी घडलेल्या अप्रिय घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संभाव्य समस्याग्रस्त भागांची तातडीने ओळख करून तिथे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे उपमहापौर बाबर यांनी यावेळी स्पष्ट केले.

पाहणीदरम्यान त्यांनी श्वानांची संख्या, लसीकरण व नसबंदीची सद्यस्थिती, श्वान पकडणारी पथके, उपलब्ध मनुष्यबळ आणि साधनसामग्री याबाबत सविस्तर माहिती घेतली. लसीकरण व नसबंदीच्या कामाला अधिक वेग देऊन ते नियमितपणे सुरू ठेवावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

तसेच, चावणाऱ्या किंवा अत्यंत आक्रमक असलेल्या श्वानांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास २४ तासांच्या आत आवश्यक कार्यवाही करून त्यांना नियमानुसार सुरक्षितपणे वेगळे ठेवण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले. ज्या भागांतून वारंवार तक्रारी येत आहेत, तिथे प्राधान्याने कारवाई करून गरज भासल्यास पथकांची संख्या आणि साधनसामग्री वाढवावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांच्या कामकाजातील अडचणी जाणून घेऊन त्यावर तात्काळ मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असली तरी निवारा केंद्रात आणलेल्या श्वानांची योग्य काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. श्वानांना वेळेवर अन्न व स्वच्छ पाणी, आवश्यक औषधोपचार आणि लसीकरण मिळत आहे का, तसेच केंद्रातील स्वच्छता योग्य आहे का, याची पाहणी त्यांनी केली. केंद्रातील व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी डॉक्टर, औषधे, पाणी किंवा अन्य सुविधांची कोणतीही कमतरता भासू देऊ नका, असे त्यांनी बजावले.

यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर यांनी नागरिकांना आवाहन केले की, भटक्या श्वानांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा समस्या असल्यास नागरिकांनी ८७८८०७०६६५ या क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्यासह पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!