दुबईला १० ते १२ हजार मोबाईल सिमकार्ड पुरवणाऱ्या आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी जाळ्याचा पर्दाफाश; पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले , दि. १७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी एका आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीचा यशस्वी पर्दाफाश केला आहे. दुबईत राहून सायबर गुन्ह्यांसाठी चक्क १० हजार ते १२ हजार मोबाईल सिमकार्ड पुरविणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा सखोल तपास करत पोलिसांनी मुंबई आणि उत्तर प्रदेश-बिहार कनेक्शन असलेल्या या रॅकेटचा छडा लावला आहे.
पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे भासंवि कलम ३१८(४), ३१७(२), ६१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील ‘म्यूल अकाऊंट’ (Mule Account) धारक आणि सायबर फ्रॉडची रक्कम काढून घेणारा आरोपी तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. सानेवस्ती, चिखली, पुणे) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचा साथीदार आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी, पुणे) याचे नाव समोर आल्याने त्यास अटक करण्यात आली.
तपासादरम्यान या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सुमंत उर्फ नानु रविंद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण, पुणे) हा दुबईत राहून सायबर गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी एलओसी (LOC) जारी करून इंटरपोलच्या मार्फत त्यास भारतात ‘डिपोर्ट’ (Deport) केल्यानंतर मुंबई विमानतळावरून त्यास ताब्यात घेण्यात आले.
मुख्य आरोपी सुमंत दसरे याच्याकडे केलेल्या चौकशीत तो चीन येथील नागरिकांसोबत मिळून सायबर फसवणुकीचे गुन्हे करीत असल्याचे उघड झाले. सायबर गुन्ह्यांसाठी लागणारे १०,००० ते १२,००० मोबाईल सिमकार्ड त्याने भारतामधून मनीष वाधवा आणि महेश चौइथरामानी यांच्यामार्फत मिळवले होते. हे सिमकार्ड कॉलिंग, बनावट ॲप्लिकेशनचे रजिस्ट्रेशन, बँक खात्यांना लिंक करणे आणि बनावट ईमेल आयडी तयार करण्यासाठी वापरले जात होते, जेणेकरून स्वतःची ओळख लपवता येईल.
सिमकार्ड पुरविणारे आरोपी मनीष अशोकलाल वाधवा (वय ४४, रा. अंबरनाथ पूर्व, मुंबई) आणि महेश कन्हैयालाल चौइथरामानी (वय ६०, रा. कल्याण पश्चिम, मुंबई) यांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुंबईतून अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी दुबईतील सुमंत दसरे याला आपले साथीदार सुरज चिकावा आणि राजा कुमार यांच्यामार्फत सिमकार्ड पुरविल्याचे कबूल केले. विशेष म्हणजे, त्यांच्या पासपोर्टची पाहणी केली असता ते २५ ते ३० वेळा दुबईला जाऊन आल्याचे निदर्शनास आले.
सिमकार्ड काढून देणारे अन्य दोन आरोपी सुरज मुन्नालाल चिकवा (वय ३२, रा. विक्रोळी, मुंबई; मूळ रा. चित्रकूट, उत्तर प्रदेश) आणि राजा अशोक कुमार (वय ३१, रा. ठाणे पश्चिम, मुंबई; मूळ रा. वैशाली, बिहार) यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघे मोबाईल सिमकार्ड कंपनीत सिमकार्ड विक्रीचे काम करत होते. नवीन सिमकार्ड घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना ‘ओटीपी एक्सपायर झाला आहे’ किंवा ‘सर्व्हर नाही, सिम ॲक्टिव्ह झाले नाही’ अशी खोटी कारणे सांगून ते ग्राहकांना सिमकार्ड न देता सदर सिमकार्ड वरील मुख्य आरोपींना पुरवत असत आणि त्या बदल्यात मोठा आर्थिक मोबदला घेत असत.
तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. चिखली रोड, पुणे) — बँक खातेधारक, आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी, पुणे) — खाते सांभाळणारा (Account Handler), सुमंत उर्फ नानु रविंद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण, पुणे) — मुख्य आरोपी, मनीष अशोकलाल वाधवा (वय ४४, रा. अंबरनाथ पूर्व, मुंबई) — दुबईत सिमकार्ड पुरविणारा, महेश कन्हैयालाल चौइथरामानी (വയ ६०, रा. कल्याण पश्चिम, मुंबई) — दुबईत सिमकार्ड पुरविणारा, सुरज मुन्नालाल चिकवा (वय ३२, रा. विक्रोळी, मुंबई) — सिमकार्ड चोरून पुरवणारा, राजा अशोक कुमार (वय ३१, ठाणे पश्चिम, मुंबई) — सिमकार्ड चोरून पुरवणारा. या आरोपींनी पुरविलेल्या सिमकार्डचा डाटा आणि त्यांचा वापर अन्य किती गुन्ह्यांमध्ये झाला आहे, याचा सखोल तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (सायबर व आर्थिक गुन्हे) रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, वैभव पाटील, पोलीस उपनिक्षक रोहित डोळस, सागर पोमण, प्रकाश कातकाडे व पथकातील अंमलदारांनी या अत्यंत क्लिष्ट आणि मोठ्या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
