अत्याचार पीडित कुटुंबातील वारसाला शासकीय नोकरी; जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन , दि. १९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत अत्याचाराच्या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र वारसाला शासकीय सेवेत नियुक्ती देण्याची महत्त्वपूर्ण कायदेशीर तरतूद आहे. या तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करत अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते पीडित कुटुंबातील वारस विष्णू महेश हिवराळे यांना शासकीय सेवेतील नियुक्तीचा आदेश प्रदान करण्यात आला.
सन २०२२ मध्ये बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेप्रकरणी (गुन्हा क्रमांक ४९३/२०२२) विशाल महेश हिवराळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पीडित कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. शासनाच्या नियमावलीनुसार मृत व्यक्तीच्या कुटुंबाचे पुनर्वसन आणि आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी पात्र वारसदाराचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागामार्फत सादर करण्यात आला होता.
त्यानुसार, मृत विशाल हिवराळे यांचे पात्र वारसदार म्हणून विष्णू महेश हिवराळे यांना सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तिवसा येथे गट-ड संवर्गातील सफाईगार पदावर रीतसर नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रत्यक्ष नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अत्याचाराच्या घटनांमध्ये कर्ता पुरुष किंवा कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पीडित कुटुंबांना कठीण प्रसंगी केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर कायमस्वरूपी सामाजिक व आर्थिक आधार मिळावा, या उदात्त हेतूने सामाजिक न्याय विभागामार्फत ही विशेष मोहीम राबवली जाते.
अमरावती जिल्ह्यात यापूर्वीही अशाच प्रकारे अत्याचार पीडित कुटुंबांतील २० पात्र वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले आहे. विष्णू हिवराळे यांच्या नियुक्तीमुळे हा आकडा आता २१ वर पोहोचला असून, प्रशासनाच्या या संवेदनशील आणि तत्पर कार्यवाहीमुळे हिवराळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
