news
‘बंगालच्या उपसागरातील अकवन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकार अलर्ट मोडवर’; ७ जिल्ह्यांतील शैक्षणिक कामकाज तात्पुरते स्थगित!‘एसटीच्या दरापेक्षा ५० टक्क्यांहून अधिक भाडे आकारल्यास कठोर कारवाईचा इशारा’; अमरावती आरटीओच्या विशेष मोहिमेत कोट्यवधींच्या गैरव्यवहाराला आळा!‘अत्याचार पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी अमरावती प्रशासनाचा मोठा पुढाकार’; तिवसा शासकीय वसतिगृहात पात्र वारसाला मिळाली नोकरी!‘सोन्याच्या दागिन्यांच्या बिलिंगमध्ये पारदर्शकता आणा अन् कारागिरांना न्याय द्या’; AMCCIE च्या वतीने केंद्र सरकारला महत्त्वाचे निवेदन!‘शहराच्या विकासापेक्षा राजकीय तडजोडी आणि सोयीचे राजकारण’; २० नोव्हेंबरच्या तिन्ही सर्वसाधारण सभांकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष!
Home अमरावती ‘एसटीच्या दरापेक्षा ५० टक्क्यांहून अधिक भाडे आकारल्यास कठोर कारवाईचा इशारा’; अमरावती आरटीओच्या विशेष मोहिमेत कोट्यवधींच्या गैरव्यवहाराला आळा!

‘एसटीच्या दरापेक्षा ५० टक्क्यांहून अधिक भाडे आकारल्यास कठोर कारवाईचा इशारा’; अमरावती आरटीओच्या विशेष मोहिमेत कोट्यवधींच्या गैरव्यवहाराला आळा!

तब्बल १६ लाख ८२ हजार २७० रुपयांचा दंड वसूल; मनमानी भाडेवाढीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी ईमेल आयडी जाहीर | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिवाळीत मनमानी भाडे आकारणाऱ्या २६७ खासगी बसेसवर कारवाई; अमरावती आरटीओची धडक मोहीम, १६.८२ लाखांचा दंड वसूल!

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. १९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा फायदा घेत खासगी प्रवासी बसचालकांकडून होणाऱ्या अवास्तव आणि मनमानी भाडेवाढीला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (RTO) विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. दिनांक २७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालवलेल्या या मोहिमेत दोषी आढळलेल्या तब्बल २६७ खासगी बसेसवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून १६ लाख ८२ हजार २७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने या विशेष मोहिमेंतर्गत एकूण १ हजार २३५ बसेसची कसून तपासणी केली. त्यामध्ये विविध प्रकारचे नियमभंग आणि गैरव्यवहार उघडकीस आले.  प्रवाशांकडून मनमानी व अवास्तव भाडे आकारणाऱ्या ७२ बसेसवर कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करून प्रवासी बसेसच्या माध्यमातून मालवाहतूक करणाऱ्या ८१ बसेसवर दंडात्मक कारवाई झाली. इतर वाहतूक गुन्हे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११४ बसेसवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.  या संपूर्ण मोहिमेदरम्यान दोषी बसचालक व मालकांकडून १६,८२,२७० रुपये दंड वसूल करण्यात आला.

सणासुदीच्या काळात खासगी प्रवासी बसेसना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेदरापेक्षा ५० टक्के जास्त दराने भाडे आकारणी करण्याची शासनाची मुभा आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक दराने भाडे आकारल्यास ते नियमांचे उल्लंघन मानले जाते.

अशा प्रकारे कोणाही बस ऑपरेटरने मनमानी किंवा जादा भाडे आकारल्यास प्रवाशांनी तत्काळ संबंधित प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवासी rto.२७-mh@mah.gov.in किंवा mh२७@mahatranscom.in या ईमेल आयडीवर आपली तक्रार पाठवू शकतात. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी यापुढेही अशी कारवाई सुरूच राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी स्पष्ट केले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!