पिंपरी, दि. १ मे २०२५: “समर्थ आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. आजचा सुशिक्षित तरुण रोजगारक्षम बनला तरच देशाची प्रगती शक्य आहे,” असे स्पष्ट मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे ‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘यशोगाथा’ विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “शिक्षणामुळे व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची ताकद मिळते. जर हे शिक्षण रोजगारक्षम असेल, तर त्याच्या विकासाचा मार्ग अधिक सोपा होतो. त्यामुळे, आजच्या काळात रोजगारक्षम पिढी घडवणारे शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे.”

या कार्यक्रमाला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी डॉ. अरुण सांगोलकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ‘यशस्वी’ संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “यशस्वी संस्थेच्या माध्यमातून कौशल्ये आधारित प्रशिक्षण घेतलेली युवा पिढी तयार होत आहे, ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. कारण देशाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढी कुशल असणे अत्यावश्यक आहे.”
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावच्या शिक्षण विस्तार अधिकारी मालती रासकर यांनी आपल्या मनोगतात गिरीश प्रभुणे यांच्या कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या, “गिरीश प्रभुणे काकांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वामुळे गुरुकुलमध्ये देशाचा आधारस्तंभ बनणारी पिढी तयार होत आहे. त्याचप्रमाणे ‘यशस्वी’ संस्थेमुळे देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारी पिढी घडत आहे.”
याप्रसंगी ‘यशस्वी’ संस्थेच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख प्रशांत कुलकर्णी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या मुख्याध्यापिका पूनम गुजर यांनी केले, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी मारुती वाघमारे यांनी यशस्वीपणे पार पाडली. या सोहळ्यात शैक्षणिक आणि इतर उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुरुकुलमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला ‘यशस्वी’ संस्थेचे मार्केटिंग अधिकारी प्रशांत कुलकर्णी, ग्रंथपाल पवन शर्मा, ऑपरेशन विभागाचे अधिकारी दिलीप पवार, इम्रान वानकर, उमेश गुरव, भरत ईप्पर, ज्ञानेश्वर गोफण, योगेश रांगणेकर यांच्यासह शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ: ‘यशस्वी’ संस्थेच्या ‘यशोगाथा’ विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर डावीकडून ‘यशस्वी’ संस्थेचे मार्केटिंग प्रमुख प्रशांत कुलकर्णी, ग्रंथपाल पवन शर्मा, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी डॉ. अरुण सांगोलकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावच्या शिक्षण विस्तार अधिकारी मालती रासकर आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या मुख्याध्यापिका पूनम गुजर उपस्थित होते.
