पिंपरी-चिंचवडच्या ‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद; सादरीकरणासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ!
महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ६ लाखांची बक्षिसे; जागतिक दर्जाच्या परीक्षकांकडून मूल्यमापन!
पिंपरी, दि. २८ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडिआय) पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. डिझाइन क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी आणि नागरिक यांचा वाढता सहभाग पाहून, या स्पर्धेतील सादरीकरणाची अंतिम मुदत आता ३० जून २०२५ पर्यंत (रात्री ११.५९ पर्यंत) वाढवण्यात आली आहे.
‘हरित सेतू’: पर्यावरणस्नेही नागरी रचनेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
‘हरित सेतू’ हा पिंपरी चिंचवड महापालिकेचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. उत्तम पदपथ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन आणि पर्यावरणस्नेही नागरी रचना, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी आणि त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी ही डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म आणि पारदर्शक मूल्यांकन
ही स्पर्धा एका जागतिक दर्जाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पार पडत आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण होईल. योग्य परीक्षण, भूमिका-आधारित प्रवेश, गुणपद्धती, हितसंबंध व्यवस्थापन आणि थेट लॉग ट्रॅकिंग यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे स्पर्धकांसाठी हा एक विश्वासार्ह अनुभव ठरत आहे.
स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या परीक्षक मंडळात डिझाइन, शहरी नियोजन, ब्रँडिंग आणि नागरी संरचना क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. एलिफंट डिझाइनच्या सह-संस्थापक अश्विनी देशपांडे या परीक्षक मंडळाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेचे नवीन वेळापत्रक:
- अंतिम सादरीकरणाची तारीख: ३० जून २०२५ (रात्री ११.५९ पर्यंत)
- निकाल जाहीर: १७ जुलै २०२५
या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ६ लाख रुपयांची पारितोषिक रक्कम दिली जाईल: प्रथम विजेत्यास ३ लाख, द्वितीय विजेत्यास २ लाख, तर तृतीय विजेत्यास १ लाख रुपये मिळतील. याशिवाय, विशेष ज्युरी उल्लेखही दिला जाईल.
परीक्षक मंडळात नामवंतांचा समावेश:
- अश्विनी देशपांडे (अध्यक्ष) – सह-संस्थापक, एलिफंट डिझाईन
- बापूसाहेब गायकवाड – सहशहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका
- आर्किटेक्चर प्रसन्ना देसाई – संचालक, पीव्हीपी आर्किटेक्चर कॉलेज
- कश्मीरा मेधोरा दुबाष – उपसंचालक, आयटीडीपी इंडिया
- चंद्रशेखर बडवे – संचालक, लोकस डिझाईन
- पूर्णिमा बुरटे – संस्थापक, डिझाईन ऑर्ब
- ऋग्वेद देशपांडे – संचालक, सेतू अॅडव्हर्टायझिंग
- रंजनादेवी दाणी – वरिष्ठ प्राध्यापक, एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन
नोंदणी आणि सादरीकरणासाठी इच्छुकांनी www.adiawards.org या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने केले आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.