news
Home पिंपरी चिंचवड हिंजवडी आयटी पार्कसाठी फडणवीसांचा ‘मास्टरप्लॅन’: आता ‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’ मार्फत समस्या सुटणार!

हिंजवडी आयटी पार्कसाठी फडणवीसांचा ‘मास्टरप्लॅन’: आता ‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’ मार्फत समस्या सुटणार!

आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना यश; डिसेंबरअखेर मेट्रो सुरू होणार, वाहतूक कोंडीतून मुक्ततेची चिन्हे. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

हिंजवडी आयटी पार्क समस्यामुक्त होणार! मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’चे आश्वासन!

आ. महेश लांडगे यांच्या पुढाकाराने मॅरेथॉन बैठक; डिसेंबर अखेर मेट्रो सुरू करणार, वाहतूक नियंत्रण आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर!

मुंबई/पिंपरी-चिंचवड, दि. १० जुलै २०२५ (प्रतिनिधी): हिंजवडी आयटी पार्कच्या वाढत्या नागरी आणि वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे. हिंजवडी आयटी पार्कची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येईल, तसेच वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित रस्ते आणि संबंधित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्व शासकीय अस्थापनांसाठी ‘‘सिंगल पॉईंट ऑथॉरिटी’’ तयार केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने विधान भवनात ही मॅरेथॉन बैठक आयोजित करण्यात आली होती.

आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनची मुख्यमंत्र्यांशी चर्चा:

हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींनी आज विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी आमदार शंकर मांडेकर आणि आमदार शंकर जगताप हे देखील उपस्थित होते.

आयटी फोरमचे सचिन लोंढे, सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यासोबत थेट चर्चा केली. बाणेर-बालेवाडी रेसिडेन्ट असोसिएशन, #UNCLOGHinjawadiITPark मोहीमेतील प्रतिनिधी, फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज, हिंजवडी एम्प्लॉईज ॲन्ड रेसिडेन्ट ट्रस्ट, मुळशी को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशनचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते.

प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तयारीची माहिती:

या बैठकीत प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी हिंजवडीच्या समस्या सोडवण्यासाठी सुरू असलेल्या तयारी आणि कार्यवाहीची माहिती दिली. यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगरपालिका आयुक्त नवकिशोर राम, ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त योगेश म्हसे, राज्य सरकारचे मुख्य सचिव, एमआयडीसी, प्रोजेक्ट डायरेक्टर नॅशनल हायवे, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड विनयकुमार चौबे, कार्यकारी संचालक महामेट्रो श्रावण हर्डिकर, आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा समावेश होता.

हिंजवडी आयटी पार्कच्या समस्या आणि मुख्यमंत्र्यांची आश्वासने:

हिंजवडी आयटी पार्क हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आयटी हब असून, दररोज सुमारे पाच लाखांहून अधिक आयटी व्यावसायिक येथे ये-जा करतात. मात्र, अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा आणि समन्वयाचा अभाव या समस्यांमुळे रहिवासी व कर्मचाऱ्यांचे आयुष्य कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर “हिंजवडी आयटी पार्कला अडथळ्यांमधून मुक्त करा” या मागणीकडे आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

यावेळी पीएमआरडीए प्रशासनाकडून प्रस्तावित रस्ते आणि संबंधित कामांचा ‘रोड मॅप’ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यासमोर प्रेझेंटेशनद्वारे सादर करण्यात आला. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून हिंजवडीला जोडणारे डीपी (Development Plan) प्रस्तावित रस्ते पूर्ण करण्यासाठी भूसंपादन करण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने गती द्यावी, असे निर्देशही देण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे रस्त्यांची प्रस्तावित कामे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत समन्वय करणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश:

या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला खालीलप्रमाणे महत्त्वाचे निर्देश दिले:

  1. सर्व विभागांच्या समन्वयासाठी ‘‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’’ तयार करा.
  2. भूमीसंपादनाच्या कामासाठी पीएमआरडीएने पुढाकार घ्यावा.
  3. लक्ष्मी चौक येथील पूल सहापदरी करा.
  4. डिसेंबर अखेर हिंजवडी मेट्रो सुरू करा.
  5. एमआयडीसीने रस्ता रुंदीकरणाची कामे पूर्ण करावी.
  6. मेट्रो प्रशासनाने पार्किंगचे नियोजन (प्रोव्हीजन) करावे.
  7. एक महिन्यामध्ये टीडीआर (TDR) द्या आणि भूसंपादन करा.
  8. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियंत्रण करा.
  9. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने वाहतूक संदर्भात अंमलबजावणी करावी.
  10. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने तातडीने कामे सुरू करावीत.
  11. पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक येथील अंडरपासचे काम सुरू करावे.

आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया:

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी फोरम आणि विविध सोसायटी फेडरेशनच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी संबंधित शासनाच्या विभागांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. हिंजवडी आयटी पार्क आणि पुणे, पिंपरी-चिंचवड परिसर ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी सर्व शासकीय अस्थापनांचे नियंत्रण विभागीय आयुक्त पाहतील, असे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत. तसेच प्रस्तावित रस्ते आणि पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी ‘फास्टट्रॅक’ वर कालबद्ध नियोजन करण्यात येणार आहे. हिंजवडी आयटी पार्कच्या समस्यांबाबत पहिल्यांदाच अशी बैठक घेण्यात आली आणि विशेष म्हणजे ती अत्यंत फलदायी ठरली आहे,” अशी प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

या निर्णयामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रहिवाशांना आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!