मॅक्स मंथन बातमीचा दणका: पिंपरी कॅम्पमधील वृक्षतोड प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्याचे आदेश!
सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि मॅक्स मंथनच्या पाठपुराव्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची कठोर भूमिका!
पिंपरी, दि. ३१ जुलै २०२५ , मॅक्स मंथन डेली न्यूज : पिंपरी कॅम्प, शास्त्रीनगर येथील तलाठी कार्यालयासमोर एका जुन्या झाडाची विनापरवाना कत्तल केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि मॅक्स मंथन डेली न्यूजने ही बातमी सर्वप्रथम प्रसिद्ध करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. आता या बातमीचा दणका बसला असून, महानगरपालिकेने या गंभीर प्रकरणाची दखल घेत अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश चिंचवड पोलिसांना दिले आहेत!
नेमके काय घडले?
९ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पिंपरी कॅम्प, शास्त्रीनगर येथील ओम साई एंटरप्रायझेस दुकानासमोर, मनपा रस्त्यालगत असलेला एक ‘पेल्टाफोरम’ (Peltophorum) प्रजातीचा अंदाजे २० वर्षांचा आणि १५२ सेमी मध्यवेध असलेला वृक्ष जमिनीलगत पूर्णपणे कापून टाकल्याचे निदर्शनास आले होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ लागू असून, कोणत्याही वृक्षाचा विस्तार कमी करणे, वृक्षतोड करणे किंवा वृक्ष पुनर्रोपण करणे यासाठी उद्यान वृक्ष संवर्धन विभागाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या प्रकरणात कोणतीही परवानगी न घेता झाडाची अमानुष हत्या करण्यात आली होती.
सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि मॅक्स मंथनची भूमिका व महानगरपालिकेची कारवाई
मॅक्स मंथन डेली न्यूजने या घटनेची गंभीर दखल घेऊन ‘पिंपरी कॅम्पमध्ये जुन्या झाडाची अमानुष हत्या; उद्यान विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!’ या शीर्षकाखाली सविस्तर बातमी प्रकाशित केली होती. सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि या बातमीमुळे प्रशासनावर दबाव वाढला आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान वृक्ष संवर्धन विभागाने तातडीने पावले उचलली.
दिनांक २ जुलै २०२५ रोजी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान वृक्ष संवर्धन विभागाने (आ.क. वृक्ष / ३ब / कावि १२९/२०२५) चिंचवड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात, शास्त्रीनगर येथील ओम साई एंटरप्रायझेस दुकानासमोर विनापरवाना कापण्यात आलेल्या वृक्षाबाबत माहिती देऊन, अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची आणि महाराष्ट्र राज्य (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, ओम साई एंटरप्रायझेस दुकानासमोर घटना घडल्याने दुकानदारांची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
पंचनामा आणि पुढील तपास
या प्रकरणी ९ जून २०२५ रोजी पंचनामा करण्यात आला होता, ज्यामध्ये भारत मिरपगारे (गांधीनगर, पिंपरी कॅम्प) हे तक्रारदार होते. पंचनाम्यात तोडण्यात आलेल्या झाडाच्या चतुःसीमा स्पष्टपणे नमूद केल्या आहेत: पूर्वेला ओम साई हेअरकटिंग सलोन, पश्चिमेला ओम साई एंटरप्रायझेस दुकान, दक्षिणेला आशा प्रिंटर्स व झेरॉक्स आणि उत्तरेला वैळावी स्नॅक्स अँड ज्यूस दुकान.
या प्रकरणाचा पुढील तपास आता चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत आहेत. मॅक्स मंथन डेली न्यूज या प्रकरणावर लक्ष ठेवून असून, दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करत राहील. पर्यावरणाची हानी करणाऱ्या अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनीही जागरूक राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
