news
‘मुंडे साहेबांचे’ सामाजिक न्यायाचे कार्य प्रेरणादायी! रहाटणीच्या छत्रपती चौकात लोकनेत्याला वंदन‘अधिकाऱ्यांनीच नोंदणी करण्यास नकार द्यायला हवा होता!’ पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांचे मोठे विधान‘बाबू गेनूं’चे शौर्य स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक दिशा देणारे! वयाच्या २२ व्या वर्षी दिलेल्या बलिदानाला महापालिकेकडून अभिवादनगरजू नागरिकांना घराची मालकी मिळणार! अमरावतीत ५००० पेक्षा जास्त अतिक्रमणे नियमात; ‘प्रधानमंत्री आवास’ आणि ‘रमाई’ योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळाहिंजवडीत हॉटेल भाड्यावरून वाद पेटला! जयहिंद अर्बन बँकेचे संचालक अजिंक्य विनोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला; सराईत आरोपी सुमित संदानशिवला जामीन नाकारला
Home पिंपरी चिंचवड पिंपरीच्या ‘सावली’ निवारा केंद्राला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक!

पिंपरीच्या ‘सावली’ निवारा केंद्राला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक!

अतिरिक्त आयुक्तांनी भेट देऊन केले कौतुक; बेघरांसाठी केवळ निवारा नव्हे, तर 'आयुष्याची नवी सुरुवात' देणारे प्रेरणादायी केंद्र. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सावली: बेघरांच्या दुःखाला मायेची सोबत

पिंपरी चिंचवड महापालिकेचे निवारा केंद्र निराधारांसाठी ठरतंय आधार

पिंपरी, दि. ३ ऑगस्ट २०२५: कधी कुणी नात्यांपासून दूर गेलेले, तर कुणी रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडलेले… काहींना मानसिक-शारीरिक आजारांनी ग्रासलेले, तर काहींना दोन घास मिळवण्यासाठी रस्तोरस्ती भटकावे लागलेले… अशा प्रत्येक निराधारासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे “सावली” हे केवळ निवाऱ्याचे ठिकाण नाही, तर मायेचा एक जिवंत स्पर्श ठरत आहे. ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ या संस्थेच्या सहकार्याने चालवण्यात येत असलेल्या या “सावली निवारा केंद्राला” अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. लाभार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत, त्यांच्या अवस्था समजून घेत त्यांना नव्या उमेदीनं जगण्याची ऊर्जा दिली.

‘सावली’ निवारा केंद्रात सध्या निराधार, बेघर, मानसिकदृष्ट्या आजारी, तसेच रस्त्यावर सापडलेले वंचित पुरुष आणि महिलांना सुरक्षित निवारा, अन्न, औषधोपचार आणि सल्लामसलत सेवा मोफत दिली जाते. या केंद्रातील कर्मचारी केवळ सेवा नाही, तर प्रेमाची आणि समजूतदारपणाची ऊबही देतात. अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी केंद्रामध्ये प्रवेश करताच लाभार्थी महिलांनी त्यांचे गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर जांभळे पाटील यांनी या सर्वांशी मनमोकळा संवाद साधला.

“तुम्हाला केंद्रामध्ये कसे वाटत आहे? येथील जेवण कसे आहे? तुम्ही येथे कसे पोहोचलात?” अशी आपुलकीने जांभळे पाटील यांनी लाभार्थ्यांची विचारपूस केली. यावेळी लाभार्थ्यांनी केंद्रामध्ये उत्तम सोयीसुविधा मिळत असल्याचे सांगत त्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिका व रिअल लाइफ रिअल पीपल संस्थेचे आभार मानले. “आम्हाला येथे काही अडचण नाही. हे केंद्र म्हणजे आमचा परिवार आहे. येथे आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा सर्व काही मिळाले आहे. आम्ही येथे आनंदात आहोत. येथे आमची खूप काळजी घेतली जाते,” अशा भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. यावर जांभळे पाटील म्हणाले की, “सावली केंद्रामध्ये तुम्हाला आणखी काही सोयीसुविधा लागल्या तर नक्की सांगा. मला तुमचा मुलगा समजून हक्काने काहीही लागले तरी हाक द्या.”

सावलीतून उभारी… आणि पुन्हा आयुष्याला सुरुवात!

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सुमारे आठ ते नऊ महिन्यांपूर्वी एका बेघर, निराधार व्यक्तीची माहिती ‘रिअल लाइफ, रिअल पीपल’ संस्थेचे एम. ए. हुसैन यांना दिली होती. या संवेदनशीलतेतून सुरू झालेली ही गोष्ट आज प्रेरणादायी ठरतेय. हुसैन यांनी त्या व्यक्तीला ‘सावली’ निवारा केंद्रात आणून हक्काचा निवारा दिला. आज हीच व्यक्ती केंद्रात उदबत्ती, धूप अशा पूजासाहित्याची विक्री करत आहे. ही प्रगती पाहून जांभळे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या केंद्रामध्ये निराधारांना स्वावलंबी करणारी अनेक उदाहरणे पाहण्यास मिळत असून हे केंद्र केवळ पुनर्वसनासाठी नव्हे, तर आयुष्याची नवी सुरूवात करून देणारे ठरू लागले आहे.

केंद्राला आवश्यक ते मदत करण्याचे दिले निर्देश

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सावली केंद्राची पाहणी करून तेथे दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची माहिती घेतली. केंद्रामध्ये लाभार्थ्यांच्या निवासासाठी असणारे हॉल, स्वयंपाकघर, पुस्तके वाचण्यासाठीची सुविधा, सीसीटीव्ही व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, स्टोअर रूम अशा विविध ठिकाणांची पाहणी जांभळे पाटील यांनी करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी केंद्रांत येण्यासाठी रॅम्पची व्यवस्था, लाभार्थ्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी गाडीची व्यवस्था, विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर बॅटरी बॅकअपची व्यवस्था करण्याबाबत तातडीने निर्देश महापालिकेच्या संबंधित विभागांना जांभळे पाटील यांनी दिले. केंद्रातील लाभार्थ्यांना जास्तीतजास्त शासकीय योजनांचा लाभ द्या, ज्या लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल ते काढण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा, केंद्रामध्ये जास्तीतजास्त सोयीसुविधा द्या, असे निर्देशही त्यांनी दिले.

रिअल लाइफ रिअल पीपल संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा केला सन्मान

निराधारांना मायेची ऊब देण्याचे काम सावली निवारा केंद्रामार्फत होत असल्याचे पाहून अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच निःस्वार्थ सेवेच्या भावनेतून सावली निवारा केंद्रात काम करणाऱ्या रिअल लाइफ रिअल पीपल संस्थेचे एम. ए. हुसैन व व्यवस्थापक गौतम थोरात, सहाय्यक व्यवस्थापक सचिन बोधनकर, समाजसेवक ॲग्नस फ्रान्सिस, एच. शहानवाज, काळजीवाहक अमोल भाट, लक्ष्मी वाईकर, विष्णू गायकवाड, कुक उमा भंडारी, लक्ष्मी कांबळे यासर्वांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला.

अधिकारी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मनोगत

समाजातील निराधार व्यक्तींना हक्काचा निवारा देण्याचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सावली निवारा केंद्रात होत आहे. महापालिकेच्या या प्रयत्नामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे. सावली हे केवळ निवाऱ्याचं केंद्र न राहता, माणुसकीच्या नात्यांनी बांधलेली एक सशक्त व्यवस्था बनत चालली आहे. या उपक्रमातून केवळ सामाजिक जबाबदारी नव्हे, तर एका संवेदनशील शहराची ओळख अधिक दृढ होत आहे. आजच्या भेटीत लाभार्थ्यांशी संवाद साधताना ते येथे आनंदात असल्याचे लक्षात आले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आमच्यासाठीही समाधान देणारा असून हा उपक्रम खूपच यशस्वी होत असल्याचा आनंद आहे.

– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

सावली निवारा केंद्रामध्ये असलेल्या निराधार व्यक्तींसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असतात. येथे येणारी प्रत्येक बेघर, निराधार व्यक्ती ही समाजाचा एक अविभाज्य घटक मानली जाते आणि तिला आवश्यक ती सर्व मदत अत्यंत संवेदनशीलतेने करण्यात येते. केवळ निवारा आणि अन्नपुरवठाच नव्हे, तर पुनर्वसन, मानसिक आधार आणि आत्मसन्मानाची जाणीव देणारे वातावरण येथे तयार केले गेले आहे.

– ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

नागरी बेघरांसाठी निवाऱ्यांच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी राज्य शासनाने गठीत केलेल्या निवारा सनियंत्रण समितीच्या निर्देशानुसार त्रिशरण एनलायनमेंट फाउंडेशनने विविध निवाऱ्यांचे परीक्षण करून अहवाल सादर केला. या अहवालात सावली बेघर निवारा केंद्र हे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्तम निवाऱ्यांपैकी ‘प्रथम क्रमांकावर’ असल्याचे घोषित करण्यात आले आहे. आज पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि उपायुक्त ममता शिंदे यांनी या केंद्राला भेट दिली असून ही भेट आमच्या संस्थेतील निराधार आई-वडिलांसाठी आश्वासक ठरली असून यातून आम्हाला अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

– एम. ए. हुसैन, संस्थापक अध्यक्ष, रिअल लाइफ रिअल पीपल

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!