आमदार महेश लांडगे यांच्यावर गंभीर आरोप; संभाजी महाराजांच्या पुतळ्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न
सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा आक्षेप; महापालिकेच्या खर्चाने उभारलेल्या पुतळ्याचे श्रेय लाटण्याचा आरोप
पिंपरी, ०६ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आमदार महेश लांडगे यांच्यावर या पुतळ्याला धार्मिक रंग देण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोप केला आहे. लांडगे यांनी १४ सप्टेंबर रोजी बोराडेवाडी, मोशी येथे पुतळ्याच्या ठिकाणी ढोल, ताशे आणि ध्वज घेऊन ‘ऐतिहासिक मानवंदना’ कार्यक्रम आयोजित केला आहे, जो वैयक्तिक पातळीवर आयोजित केल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे.
हा कार्यक्रम अधिकृत नाही – सचिन काळभोर
काळभोर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने हा कार्यक्रम अधिकृत जाहीर केलेला नाही. त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कार्यक्रमाच्या पत्रिकेतही याचा कोणताही उल्लेख नाही. महानगरपालिकेने ‘सर्वधर्म समभाव’ हे उद्दिष्ट समोर ठेवून पुतळ्याची निर्मिती केली असताना, आमदार लांडगे त्याला जाणूनबुजून धार्मिक रूप देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नुकतेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने आपल्या मालमत्तांवर किंवा मैदानावर धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, असा जीआर (शासन निर्णय) काढला होता. त्यामुळे, या कार्यक्रमाला कोणत्या आधारावर परवानगी देण्यात आली, असा सवालही काळभोर यांनी उपस्थित केला.

केवळ ढोल-ताशा नाही, संग्रहालय उभारावे
काळभोर यांनी केवळ ढोल-ताशा वाजवून मानवंदना देण्याऐवजी, महापालिकेने या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक माहिती देणारी व्यवस्था निर्माण करावी, अशी सूचना केली आहे.
“महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून देशातील सर्वात उंच पुतळा उभारला आहे. या ठिकाणी केवळ कार्यक्रम घेऊन श्रेय लाटण्यापेक्षा शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि पर्यटकांसाठी छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र, त्यांच्या लढाया आणि ऐतिहासिक कार्याची माहिती देणारे स्वतंत्र कक्ष किंवा संग्रहालय उभारले पाहिजे,” असे काळभोर यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, आमदार लांडगे केवळ श्रेय घेण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करून नागरिकांची दिशाभूल करत आहेत. हा कार्यक्रम महापालिकेने स्वतः राबवावा, जेणेकरून नागरिकांना या ऐतिहासिक स्थळाविषयी योग्य माहिती मिळेल, अशी त्यांची मागणी आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
