
पुणे-मुंबई मिसिंग लिंकवर कंटेनर अन् बसचा भीषण अपघात; ३ तासांपासून वाहतूक ठप्प, अवजड वाहनांच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह!
पुणे/पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नवनिर्मित कनेक्टिंग (मिसिंग) लिंकवर आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास एक खासगी बस आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात बसची डावी बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली असून ५ ते ६ प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक गेल्या तीन तासांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे.
पहाटे ५ च्या सुमारास मिसिंग लिंकवरून जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने पुढे जाणाऱ्या खासगी प्रवाशी बसला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसचा डावीकडील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. अपघाताची माहिती मिळताच मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या अपघातामुळे प्रशासकीय यंत्रणा आणि महामार्ग पोलिसांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना प्रवेशास सक्त मनाई (बंदी) असतानाही हा कंटेनर या मार्गावर आलाच कसा? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. अशा नियमबाह्य अवजड वाहनांच्या घुसखोरीमुळेच महामार्गावर इतर वाहनचालकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपघातानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक मिसिंग लिंकपूर्वीच्या जुन्या पर्यायी मार्गावरून द्रुतगती महामार्गावर वळवण्यात आली आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्त्यावरील अडथळे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून त्यावर कोणताही परिणाम झालेला नाही.
महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना धैर्याने प्रवास करण्याचे, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आणि पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.







