चालक-वाहकाच्या प्रसंगावधानाने बस थेट पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये; ५५ वर्षीय प्रवाशाला मिळाले जीवदान!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: चालत्या बसमध्ये अचानक उच्च रक्तदाब वाढून आणि हृदयविकाराचा झटका आल्याने गंभीर प्रकृती झालेल्या एका ५५ वर्षीय प्रवाशासाठी पीएमपीएमएल (PMPML) बसचे चालक आणि वाहक साक्षात ‘देवदूत’ ठरले आहेत. बसमधील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आणि तत्परतेमुळे प्रवाशाला वेळेत वैद्यकीय मदत मिळून त्याचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारच्या पाळीत मार्ग क्रमांक १२१/२ या मार्गावर पिंपरी मनपाकडून भोसरीकडे जात असताना सकाळी ६:५० वाजेच्या सुमारास चाकण येथील रहिवासी (वय ५५ वर्षे) हे पिंपरी ते चाकण असा प्रवास करत होते. नाशिक फाट्याजवळ पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या गेटसमोर बस आली असता, प्रवाशाला अचानक प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. घामाघूम अवस्थेत छातीत तीव्र वेदना होऊन (हार्ट अटॅकचा त्रास) त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच वाहक शुभम नलावडे (बॅज क्र. ५१०२००) आणि चालक रवींद्र धुणभाव (बॅज क्र. ५१९७) यांनी जराही वेळ न घालवता कमालीचे प्रसंगावधान दाखवले. त्यांनी बस थेट जवळच असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या परिसरात नेली. वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘गोल्डन आवर’मध्ये रुग्णाला रुग्णालयात पोहोचवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
रुग्णालयात पोहोचताच वाहक आणि चालकाने आपत्कालीन विभागातील (Emergency Department) डॉक्टरांच्या टीमला तात्काळ कल्पना दिली. रुग्णालयाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला कॅज्युअल्टी विभागात दाखल करून घेतले व प्राथमिक तसेच अत्यावश्यक उपचार सुरू केले. सध्या रुग्णावर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता पूर्णपणे व्यवस्थित आणि स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
सदर बस ही अँथोनी कंपनीच्या अंतर्गत कार्यरत असून, चालक रवींद्र धुणभाव आणि वाहक शुभम नलावडे यांनी दाखवलेल्या या महान कार्याबद्दल व मानवी संवेदनशीलतेबद्दल अँथोनी कंपनीचे सुपरवायझर सुरेश लिटके यांनी दोघांना सलाम करत त्यांचे विशेष कौतुक केले आहे. या तत्परतेमुळे कंपनीचे नाव उंचावले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. चालक व वाहकाच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.












