30
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखालील भव्य ‘तिरंगा रॅली’ला अभूतपूर्व प्रतिसाद; आमदार महेशदादा लांडगे, अमित गोरखे व शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची प्रमुख उपस्थिती!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संत तुकाराम नगर येथे भव्य ‘तिरंगा रॅली’ चे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी (पिंपरी-चिंचवड शहर) आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने, कामगार चळवळीचे खंदे नेते तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या समर्थ नेतृत्वाखाली ही भव्य रॅली पार पडली.
या रॅलीस भोसरी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, सदाशिव खाडे, पक्षनेते प्रशांत शितोळे आणि अजीज भाई शेख यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर विशेषत्वाने उपस्थित होते.
संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या मुख्य कार्यालयापासून रॅलीला अतिशय दिमाखात सुरुवात झाली. तेथून पंचशील बुद्ध विहार, संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन, मैत्री चौक, जिरे टोपी चौक, महेश नगर, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, वाय. सी. एम. हॉस्पिटल, आचार्य अत्रे सभागृह, वल्लभ नगर, हुतात्मा चौक, साईबाबा मंदिर आणि शनी मंदिर चौक मार्गे मार्गक्रमण करत रॅलीचे पुनश्च श्रमिक आघाडी कार्यालयाजवळ भव्य सभेत रूपांतर झाले. हातात तिरंगा घेऊन हजारो नागरिक, महिला आणि तरुण या ५ ते ६ किलोमीटरच्या प्रवासात देशभक्तीपर घोषणा देत उत्साहाने सहभागी झाले होते.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार अमित गोरखे म्हणाले,
“कामगार नेते यशवंतभाऊ भोसले हे केवळ कामगारांच्या हक्कासाठीच नव्हे, तर सातत्याने सामाजिक व राष्ट्रहिताचे विविध उपक्रम राबवण्यात आघाडीवर असतात. त्यांच्यावर असलेला जनविश्वास आणि भारतमातेविषयीची निष्ठा या भव्य रॅलीतून स्पष्टपणे दिसून आली. विशेषतः ज्येष्ठांपासून महिलांपर्यंत सर्वांचा ५-६ किलोमीटर पायी चालून झालेला सहभाग हा यशवंतभाऊंच्या नेतृत्वाची मोठी पावती आहे.”
सभेत उपस्थितांना संबोधित करताना कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले की,
“देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण नव्या पिढीला व्हावे आणि त्यागाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार या रॅलीचे आयोजन केले. श्रम आणि कामगार शक्तीसोबतच राष्ट्रशक्ती एकत्र आली की देशाची प्रगती वेगाने होते. या उपक्रमात सर्व कामगार, महिला व नागरिकांनी दिलेला पाठिंबा अभूतपूर्व आहे.”
या भव्य तिरंगा रॅलीचे नेटके संयोजन मंडल अध्यक्ष मंगेशजी धाडगे, ज्ञानेश्वर (माऊली) थोरात, नंदू आप्पा कदम, किरण सुवर्ण, जयदेव अक्कलकोटे, मुन्ना बाविस्कर, उद्योजक दीपक शेठ पाटील, दिनेश पाटील, राहुल शितोळे, दत्ता गायकवाड, अमोल घोरपडे, राहुल खाडे, संतोष दुबे, विजय दळवी, मनिष अमोलिक, प्रभजोत सिंगहंस व सहकाऱ्यांनी केले.
रॅलीच्या सांगता सभेत देशाची एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


