18
न्यू सिटी प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘भव्य तिरंगा रॅली’ला उत्स्फूर्त प्रतिसाद!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल (रहाटणी) येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभागाच्या सभापती सविताताई खुळे यांच्या हस्ते मुख्य ध्वजवंदन पार पडले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळेच्या वतीने ‘हर घर तिरंगा रॅली’ चे भव्य आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली ही रॅली शिवार चौक मार्गे पुन्हा शाळेत आली. या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
शाळेच्या सुसज्ज बँड पथकाच्या तालावर शिस्तबद्ध रीतीने मार्गक्रमण करणाऱ्या या रॅलीत पर्यावरण संवर्धन, स्वच्छ भारत, महिला सशक्तीकरण आणि शिक्षणाचे महत्त्व सांगणारे संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांनी हातात धरले होते. स्थानिक नागरिकांनी रॅलीचे ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून आणि टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त स्वागत केले.
या प्रसंगी प्री-प्रायमरीची विद्यार्थिनी अरिका पवार, इयत्ता दुसरीचा चैतन्य कोरे, इयत्ता चौथीचा युग माने आणि इयत्ता सहावीची ईशानी सोळुंके या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि सांस्कृतिक उपक्रमांतून उपस्थितांची मने जिंकली. कल्पना चौधरी व अनिता पाटील यांनी झेंडागीत गायले, तर उर्मिला ठोंबरे, मेघा विभुते व डिंपल काळे या शिक्षिकांनी विविध भाषांतून देशाविषयी माहिती मांडली.
कार्यक्रमा दरम्यान पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेवटी ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.
या सोहळ्यास संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार, माजी पोलीस उपनिरीक्षक सुरेश भालेराव, उद्योजक अरुण डोईफोडे, ऑल इंडिया पॅंथर्स सेनेचे सचिव जितेश जगताप, कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, डॉ. प्रियंका कोकणे, सामाजिक कार्यकर्ते युवराज प्रगने, मयूर ओव्हाळ, सागर शिनगारे, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पतंगे व सोनाली माळी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कल्पना चौधरी यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


