56
सांगवीत ‘यश ज्येष्ठ नागरिक संघाचा’ १० वा वर्धापन दिन व स्वातंत्र्यदिन उत्साहात; समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: सांगवी येथील ‘यश ज्येष्ठ नागरिक संघाच्या’ वतीने भारताचा स्वातंत्र्यदिन तसेच संघाचा १० वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि गौरवशाली वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाचा अमूल्य ठेवा आणि मार्गदर्शक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभागाच्या अध्यक्षा तथा सांगवीच्या नगरसेविका तृप्तीताई कांबळे यांच्या शुभहस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडले. या प्रसंगी देशभक्तीचा संदेश देत त्यांच्या हस्ते १०० हून अधिक नागरिकांना सन्मानाने राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगे सर होते. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन आदरपूर्वक स्वागत केले.
या वेळी बोलताना माजी नगरसेवक संतोष कांबळे यांनी संघाच्या प्रवासाला उजाळा दिला. १५ ऑगस्ट २०१७ रोजी स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेतून अवघ्या ५० ते ६० सभासदांपासून सुरू झालेल्या या संघाची सभासदसंख्या आज २०० च्या पार पोहोचली आहे. ज्येष्ठांना एकत्रित आणून त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी करून घेणे हा या संघाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेविका तृप्तीताई कांबळे यांनी सर्व ज्येष्ठ सभासदांना वर्धापन दिनाच्या व ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असणाऱ्या ज्येष्ठांना शुभेच्छा दिल्या. “ज्येष्ठांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत,” असे आश्वासन त्यांनी दिले.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असलेल्या सर्व ज्येष्ठ सभासदांचा केक कापून तसेच गुलाबपुष्प आणि पेन भेट देऊन भावूक वातावरणात सत्कार करण्यात आला.
तसेच सांगवीचे सामाजिक कार्यकर्ते सुनील पोकरे यांनी भारतीय संविधानाची भव्य प्रतिमा संघाला भेट दिली. १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) या राष्ट्रीय दिनांमागील ऐतिहासिक महत्त्व आणि संविधानाचे मूल्य सोप्या भाषेत पटवून देत उपस्थितांची दाद मिळवली.
या सोहळ्यास सांगवीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील ढोरे, राजू साळवे यांच्यासह संघाचे ७० ते ८० ज्येष्ठ सभासद उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बाराते, उपाध्यक्ष त्रिंबक देशमुख, कार्याध्यक्ष सूर्यकांत पराडकर, सचिव बाळासाहेब सोनावणे, खजिनदार ज्ञानेश्वर शिंगाडे व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सचिव बाळासाहेब सोनावणे यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


