news
Home पिंपरी चिंचवड देशभक्तीपर गीतांनी निगडी परिसर भारावला; Youvan संस्था आणि महापालिकेचा संयुक्त उपक्रम

देशभक्तीपर गीतांनी निगडी परिसर भारावला; Youvan संस्था आणि महापालिकेचा संयुक्त उपक्रम

निगडीत सामूहिक 'वंदे मातरम्' व देशभक्तीपर गीतांचा सोहळा; बालकलाकार पृथ्वीराज इंगळेचे सादरीकरण ठरले आकर्षण | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

स्वातंत्र्यदिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर; सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून निगडी येथील ऐतिहासिक भक्ती-शक्ती समूहाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या विविध देशभक्तीपर कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले. ‘Youvan’ संस्था आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन सोहळ्यास तसेच महापालिकेच्या वतीने आयोजित देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमास महापौर रवि लांडगे यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला.

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमान जागवणारे प्रेरणागीत ठरले. या ऐतिहासिक वारशाचे स्मरण करण्यासाठी आणि नव्या पिढीमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो नागरिक, युवक व विद्यार्थ्यांच्या सामूहिक स्वराने भक्ती-शक्ती परिसर दुमदुमून गेला.

या सोहळ्यात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रमादरम्यान बालकलाकार ‘वंडर बॉय’ पृथ्वीराज सतीश इंगळे याने ‘मेरा जूता है जापानी’ हे गीत अत्यंत आत्मविश्वासाने सादर केले. त्याच्या या सुरेल सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापौर रवि लांडगे यांनी पृथ्वीराजचे विशेष कौतुक करत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“स्वातंत्र्यदिन हा देशसेवेसाठी त्याग आणि बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक स्वरांतून राष्ट्रप्रेम आणि मातृभूमीप्रती असलेली निष्ठा दिसून येते. नव्या पिढीच्या मनात राष्ट्रप्रेमासोबतच राष्ट्रविकासातील स्वतःच्या जबाबदारीची जाणीव निर्माण होणे काळाची गरज आहे.”
— रवि लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड)

या प्रसंगी आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसदस्य पंकज भालेकर, अतिश बारणे, जनता व संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह Youvan संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कलाकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!