2
८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रविकासाची शपथ! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पिंपरी महापालिकेत ध्वजारोहण; ‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणाली व CSR पोर्टलचे लोकार्पण!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “स्वातंत्र्य म्हणजे केवळ आपल्याला मिळालेला अधिकार नसून राष्ट्र आणि समाजाप्रती असलेली मोठी जबाबदारीदेखील आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास करताना प्रत्येक नागरिकाला दर्जेदार मूलभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुलभ सेवा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. स्वातंत्र्याची मूल्ये जपत लोककल्याण, पर्यावरण संवर्धन, महिला सन्मान आणि सर्वसमावेशक विकासाचा ध्यास घेऊन पिंपरी-चिंचवडला देशातील आदर्श शहर बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिकेने डिजिटल प्रशासनाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘स्वागतम ई-प्रवेश’ (क्षेत्रीय कार्यालय प्रवेश प्रणाली) या ऑनलाईन सेवेचा शुभारंभ तसेच CSR पोर्टलचे भव्य उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या आधुनिक सुविधांमुळे नागरिकांना महापालिकेच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.
महिलांना समानतेने, आदराने आणि संवेदनशीलतेने वागणूक देणे, महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळ निर्माण करणे तसेच पोश (POSH) कायदा, पोश धोरण आणि शी-बॉक्स पोर्टलबाबत व्यापक जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. माती व पाण्याचे जतन करत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्याची आणि शहराच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्याची सामूहिक शपथ उपस्थितांनी घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
“महापालिका भवनात नागरिकांना प्रवेशासाठी ‘ई-स्वागतम’ पास प्रणाली १ मे पासून सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आज महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ही प्रणाली विकसित करून तिचे लोकार्पण करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना सुलभ, पारदर्शक सुविधा मिळेल, त्यांचा वेळ वाचेल आणि कार्यालयीन कामकाज अधिक सुव्यवस्थित होण्यास मदत होईल.”— डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
या सोहळ्यास विधान परिषद सदस्या आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर योगेश बहल, कला, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, ‘ल’ प्रभाग अध्यक्ष रेखा देवकर, नगरसदस्या मधुरा शिंदे, वर्षा जगताप, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, सहआयुक्त मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, ममता शिंदे, चेतना केरूरे, सहशहर अभियंता मनोज सेठीया, अजय सूर्यवंशी, प्रेरणा सिनकर यांच्यासह विविध विभागप्रमुख, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


