27
८० व्या स्वातंत्र्यदिनी शहर काँग्रेसकडून ध्वजारोहण; देशाची लोकशाही अबाधित राखणे हीच खरी ध्वजवंदना — नरेंद्र बनसोडे!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे मध्यवर्ती कार्यालय, ब्रह्मा कॉम्प्लेक्स (पिंपरी चौक) येथे प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात मुख्य ध्वजारोहण पार पडले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवादलाच्या स्वातंत्र्यदिन शिष्टाचारानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘वंदे मातरम्’, ध्वजारोहण, राष्ट्रध्वजाला सलामी, मान्यवरांचे मनोगत आणि राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना प्रदेश सचिव अशोक मोरे यांनी देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यावेळी बोलताना म्हणाले,
“स्वातंत्र्यवीरांचे मोठे बलिदान, त्याग आणि समर्पणामुळेच आपल्याला हे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. त्याचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. आजच्या परिस्थितीत संविधानाच्या मूल्यांची होणारी पायमल्ली रोखण्यासाठी सर्वांनी सज्ज होण्याची गरज आहे. देशाची लोकशाही अबाधित राखणे हीच खरी ध्वजवंदना ठरेल, असा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे.”
या सोहळ्यास काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश सचिव अशोक मोरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, काँग्रेस सेवादलाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, हिराचंद जाधव, हरीश डोळस, विल्यम साळवी, कुणाल भोसले, गौरी नरसिंगे, कृष्णा जाधव, रोहित भाट, सूरज माने, नबीलाल मुल्ला, मंगेश चव्हाण, सूरज कोथिंबिरे, भास्कर नारखेडे, गुंगा क्षीरसागर, मैनू भाई शेख, राजू परदेशी, महबूब शेख, राजेश संपांगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


