news
Home पिंपरी चिंचवड वाढदिवसाचा जल्लोष टाळून ‘कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ९ कुटुंबांना एकूण ९ लाखांची मदत सुपूर्द

वाढदिवसाचा जल्लोष टाळून ‘कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ९ कुटुंबांना एकूण ९ लाखांची मदत सुपूर्द

मोशी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना महापौर रवि लांडगे यांच्याकडून प्रत्येकी १ लाखाची मदत | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: मोशी येथील अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी माणुसकीचा हात पुढे केला आहे. यंदाचा आपला वाढदिवस कोणत्याही प्रकारे उत्साहात अथवा जल्लोषात साजरा न करण्याचा अत्यंत संवेदनशील निर्णय घेत, त्यांनी ‘कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठान’च्या माध्यमातून या दुर्घटनेतील मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला १ लाख रुपये याप्रमाणे एकूण ९ लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.
मोशी येथील दुर्घटनेने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर हादरले असून अनेक कुटुंबांचे मुख्य आधार हिरावले गेले आहेत. या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यापेक्षा संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका महापौर रवि लांडगे यांनी घेतली.

‘कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठान’च्या वतीने दुर्घटनेतील मृत भावेश वाणी, अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील, राहुल गायकवाड आणि वामन कसबे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. आयोजित विशेष पत्रकार परिषदेदरम्यान मृतांच्या नातेवाइकांना या मदतीचे धनादेश हस्तांतरित करण्यात आले.
या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका योगिता नागरगोजे, राहुल लांडगे यांच्यासह पीडित कुटुंबातील सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

“वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो; मात्र आपल्या शहरातील नऊ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना वाढदिवसाचा जल्लोष करणे मनाला पटणारे नाही. आपल्या माणसांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हाच माझ्यासाठी वाढदिवसाचा खरा अर्थ आहे. आर्थिक मदतीने त्यांच्या प्रिय व्यक्तीची उणीव कधीही भरून निघणार नाही; मात्र ‘या कठीण काळात तुम्ही एकटे नाही, संपूर्ण शहर तुमच्यासोबत आहे’, हा विश्वास त्यांना देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.”
— रवि लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड)
कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू, वंचित आणि संकटग्रस्त नागरिकांना यापुढेही सतत मदत केली जाईल, असा पुनरुच्चार या वेळी करण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!