34
अमरावतीत रेणुका कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. १७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: संत कबीर बहुउद्देशीय संस्था संचलित रेणुका कॉलेज ऑफ नर्सिंग, अमरावती येथे भारताचा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात मध्यवर्ती जिल्हा कारागृह, अमरावतीच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत कबीर बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष तथा रेणुका कॉलेज ऑफ नर्सिंगच्या संचालक अॅड. कविता मुळे या होत्या.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, संविधानिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका याविषयी मौलिक मार्गदर्शन केले. देशाच्या स्वातंत्र्याची जपणूक करताना प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्यांचा आदर करून सामाजिक बांधिलकी जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित सर्व प्रमुख मार्गदर्शकांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून वसुंधरा शहर स्तर संघ (DAY-NULM), मनपा अमरावतीच्या अध्यक्ष सुजाता गणेश, सृजन मराठी साहित्य परिषद महाराष्ट्रचे जिल्हा समन्वयक संदीप देशमुख, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर तसेच संत कबीर संस्थेच्या सचिव देवयानी मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास रेणुका कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुटसुटीत सूत्रसंचालन भाग्यश्री राऊत यांनी केले, तर नियाज भाई यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


