25
पिंपरी-चिंचवड शहरात ६८ वर्षीय महिलेची ७६ लाख रुपयांची ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे ऑनलाईन फसवणूक; २४ तासांत १२ गुन्ह्यांची नोंद!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. २३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात २२ सप्टेंबर २०२६ रोजी २४ तासांच्या कालावधीत विविध पोलीस ठाण्यांतर्गत एकूण १२ गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सायबर फसवणूक, रस्ता अपघात, दुखापत, जबरी चोरी आणि बेकायदेशीर अग्निशस्त्रांची वाहतूक अशा प्रमुख गुन्ह्यांचा समावेश आहे.
चिखलीतील ज्येष्ठ महिलेची ७६ लाखांची ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे फसवणूक
सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, वडाचा मळा, जाधववाडी, चिखली येथील ६८ वर्षीय ज्येष्ठ महिलेस अज्ञात व्हॉट्सॲप नंबरवरून कॉल करून पोलीस गणवेशातील बनावट अधिकारी असल्याचे भासवण्यात आले. फिर्यादीच्या आधार कार्डवरून सिमकार्ड काढून गैरप्रकार, दहशतवादी कारवाया आणि मनी लाँडरिंगचे गुन्हे दाखल असल्याचे सांगून सुप्रीम कोर्टाचे बनावट अरेस्ट वॉरंट व नोटीस दाखवण्यात आल्या. डिजिटल अरेस्टची धमकी देऊन फिर्यादीकडून एकूण ७६,२२,५४१/- रुपये विविध बँक खात्यांवर भरण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सपोनि भोपळे व पोनि गायकवाड तपास करत आहेत.
दिघी येथे बेकायदेशीर पिस्तूल बाळगणारा जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कारवाई
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पठारे मळा, ९० फुटी रोड, चरहोली बुद्रुक येथे खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत राहुल रमेश चव्हाण (वय २६, रा. दिघी) याला अटक केली. त्याच्याकडून ५३,००० रुपये किमतीचे १ लोखंडी पिस्तूल, १ मॅगझिन आणि २ जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, मध्य प्रदेशातील ‘पाजी’ नावाच्या आरोपीचा शोध सुरू आहे. पोउपनि शिंदे पुढील तपास करत आहेत.
दापोडी व मोशी येथे रस्ते अपघातांत दोघांचा मृत्यू
स्पाईन रोडवर मोटर सायकल (MH 14 GV 6437) फुटपाथ आणि झाडाला धडकून झालेल्या अपघातात चालक प्रफुल्ल दिवाकर चांदुरकर (वय ३८, रा. तळवडे) यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. भारत माता चौक, मोशी येथे एसटी बसने (MH 20 GC 3685) दिलेल्या धडकेत ॲक्टिव्हा चालक अरुण बाजीराव कुंभार (वय ५७, रा. मोशी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर नोंद झालेले प्रमुख गुन्हे
छत्रपती शिवाजी चौक, दापोडी येथे टेम्पोमधून ४,५३,००० रुपये किमतीचे ४५ घरगुती व कमर्शियल एचपी गॅस सिलेंडर बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी श्यामलाल मामराज विश्नोई (वय २०, रा. जोधपूर, राजस्थान) याच्याविरुद्ध जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हा दाखल. देहूरोड भाजी मंडईजवळ बेकायदेशीरपणे रमी जुगार खेळणाऱ्या रियाजुल रंगरेज, चंद्रकांत अनागोंदी, अरुन सरोदे आणि चांद शेख यांच्यावर कारवाई करून १२१० रुपये रोख व साहित्य जप्त. ट्रान्सपोर्टनगर निगडी येथे १०,००० रुपयांचा मोबाईल हिसकावून पळून गेलेल्या प्रज्ञावंत गणेश क्षिरसागर (वय २०, रा. पिंपरी) या आरोपीस अटक करण्यात आली. संत तुकारामनगर (पाटोदा ते वल्लभनगर प्रवासादरम्यान ६५,००० रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण व मोबाईल चोरी) आणि महाळुंगे (सूर्या हॉटेलसमोरून ५०,००० रुपये किमतीची होंडा शाईन MH 12 KU 6242 चोरी). दापोडी आणि आळंदी (मरकळ) परिसरात वैयक्तिक वादातून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
