news
Home पिंपरी चिंचवड ‘स्टार बाजार’मधील चोऱ्यांचे सत्र थांबवले; वाकड तपास पथकाची धडाकेबाज कारवाई!

‘स्टार बाजार’मधील चोऱ्यांचे सत्र थांबवले; वाकड तपास पथकाची धडाकेबाज कारवाई!

पिंपरी, चिखली अन् वाघोलीतील गुन्ह्यांची आरोपींकडून कबुली; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई यशस्वी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वाकड पोलिसांची मोठी धडक कामगिरी! ‘स्टार बाजार’मध्ये महागड्या वस्तूंची चोरी करणारी मुंबईतील सराईत टोळी जेरबंद; ७ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

वाकड (पिंपरी) : सुपरमार्केट आणि मॉल्समध्ये खरेदीच्या बहाण्याने घुसून गोवर्धन तूप, काजू, बदाम यांसारख्या महागड्या खाद्यवस्तूंची चोरी करणाऱ्या मुंबईतील एका सराईत आंतरजिल्हा टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाकड तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ महिला आणि ३ पुरुष अशा एकूण ७ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार, ऑटो रिक्षा व चोरीचा मुद्देमाल असा एकूण ७,२१,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दत्त मंदिर रोड (वाकड) आणि कलाटे वस्ती येथील ‘स्टार बाजार’मध्ये २९ ऑगस्ट आणि १२ ऑगस्ट रोजी आरोपींनी रिक्षाने येऊन सुमारे ४२,१०- रुपयांचे गोवर्धन तूप, काजू, बदाम व इतर वस्तू चोरल्या होत्या. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वाकड पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारीक पाहणी केली आणि तांत्रिक तपास सुरू केला. चोरीसाठी वापरलेली इनोव्हा कार १२ ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने गेल्याचे व नंतर पुन्हा पिंपरी-चिंचवड परिसरात आल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांच्या पथकाने तातडीने शोध मोहीम राबवून ताथवडे-वाकड परिसरातून इनोव्हा कार आणि ऑटो रिक्षासह आरोपींना घेराव घालून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी
रविकांत देवानंद जाकरे (वय ३२, रा. जोगेश्वरी ईस्ट, मुंबई / मुळ – नांदेड) , ब्रिजेश सिताराम मदेशिया (वय २७, रा. जोगेश्वरी ईस्ट, मुंबई) , बिजेश बाजू यादव (वय ३७, रा. जोगेश्वरी वेस्ट, मुंबई) , सोवन बालु शेख (वय ३७, रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई / मुळ – नांदेड) , सलमा शकिल शेख (वय ४१, रा. भोसरी, पुणे) , सानिया वालुमिया शेख (वय २०, रा. जोगेश्वरी ईस्ट, मुंबई) , रुमा ब्रिजेश मदेशिया (वय २७, रा. जोगेश्वरी ईस्ट, मुंबई)

अटक आरोपींची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी पिंपरी पोलीस ठाणे (गु. र. क्र. ६४७/२०२६) आणि चिखली पोलीस ठाणे (गु. र. क्र. ४१०/२०२६) हद्दीतील ‘स्टार बाजार’मधील चोऱ्यांची कबुली दिली. याशिवाय काटे पिंपळे आणि केसनंद फाटा (वाघोली) येथील स्टार बाजारमध्येही काजू, बदाम व तुपाचे पाऊच चोरल्याचे त्यांनी मान्य केले. आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांनी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणीही अशाच प्रकारे गुन्हे केले असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-२) प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (वाकड विभाग) सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे आणि पोलीस अंमलदार दळे, चंद गिरे, विजय घाडगे, विजय भुसारे, मोहम्मद नदाफ, सचिन गायकवाड, विजय मोरे, कीर्तेय खराडे, ज्ञानदेव झेंडे, कारभारी पालवे, विक्रम भगत, समाधान कावळे, प्रमोद गायके, अभिषेक मांडे व मंगेश लोखंडे यांच्या पथकाने केली.  प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!