6
पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांवर महापालिकेचा सर्जिकल स्ट्राइक; पुनावळेतील ४०×३० चा अवाढव्य होर्डिंग निष्कासित!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: देशपातळीवर औद्योगिक नगरी आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी तसेच महापालिकेचा महसूल बुडवणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलकांवर (Hoarding) महापालिका प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने शहरात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून पुनावळे येथील एक मोठा अनधिकृत लोखंडी जाहिरात फलक स्ट्रक्चरसह भुईसपाट करण्यात आला आहे.
पुनावळेतील ताथवडे रोड, विष्णूदेव नगर (पुणे ३३) या ठिकाणी महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीरपणे ४०×३० आकाराचा अवाढव्य जाहिरात फलक उभा करण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
याची तातडीने दखल घेत, उपआयुक्त (परवाना) राजेश आगळे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या पथकाने मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी धडक कारवाई करत सदर जाहिरात फलक संपूर्ण लोखंडी स्ट्रक्चरसह (Iron Structure) निष्कासित केला.

शहराचे सौंदर्य खराब करणाऱ्या आणि अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या होर्डिंग्जवर सातत्याने कारवाई केली जात आहे. मागील महिन्यात ताथवडे येथील अनधिकृत जाहिरात फलक, थरमॅक्स चौक, समर्थ सहकारी बँकेच्या इमारतीवरील फलक, तसेच चोविसावाडी (सर्व्हे नं. १७५/९, काळीभित रोड) येथील बेकायदेशीर जाहिरात फलक महापालिकेने हटवले आहेत.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नियम २४४, २४५ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्ह व स्कायसाईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण नियम २०२२ मधील तरतुदींनुसार खाजगी किंवा सार्वजनिक जागेत जाहिरात फलक उभारण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. पूर्वपरवानगी न घेता फलक उभारल्यास शहराचे विद्रुपीकरण होतेच, शिवाय महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नातही मोठा खड्डा पडतो.
“पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील सर्व जाहिरात एजन्सींनी याची गंभीर दखल घ्यावी. यापुढे शहरात कुठेही अनधिकृत जाहिरात फलक उभारण्यात येऊ नयेत. असे फलक आढळल्यास ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत तात्काळ निष्कासित केले जातील आणि संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”— राजेश आगळे (उपआयुक्त, परवाना व आकाशचिन्ह विभाग, मनपा)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
