14
जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तपदी अनुसूचित जातीतील व्यक्ती असणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मंदिर सत्याग्रहाच्या स्वप्नाची पूर्तता : डॉ. धनंजय भिसे!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “आज सामाजिक परिवर्तन केवळ मंदिरात प्रवेश मिळविण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. ज्या दलित, उपेक्षित आणि वंचित समाजाला कधीकाळी मंदिराच्या दाराबाहेर उभे केले जात होते, त्याच समाजातील मातंग तरुणाला महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाच्या मंदिराचा प्रमुख विश्वस्त म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळणे, ही अत्यंत ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी बाब आहे. हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून सामाजिक समतेच्या दिशेने झालेल्या प्रदीर्घ संघर्षाचा गौरव आहे,” असे प्रतिपादन डॉ. धनंजय भिसे यांनी केले.
समरसता मंच, बारामती जिल्ह्याच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती अभिवादन कार्यक्रमात प्रमुख वक्त म्हणून ते बोलत होते.
डॉ. भिसे पुढे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ मार्च १९३० रोजी नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मंदिराचे दरवाजे उघडण्याची मागणी केली. या मागणीमागे माणूस म्हणून सन्मान, सामाजिक प्रतिष्ठा आणि समानतेचा अधिकार होता. आज अनिल सौंदडे यांच्यासारख्या मातंग समाजातील तरुणाला जेजुरीच्या श्री खंडेराया देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदाची जबाबदारी मिळणे, हे त्या समतेच्या विचारांचे प्रतीक आहे. काल मंदिराच्या दारात प्रवेशासाठी संघर्ष करणारा समाज आज मंदिराच्या व्यवस्थापनाचे नेतृत्व करत आहे. ही घटना बाबासाहेबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरविणारी आहे.”
महापुरुषांच्या विचारांवर भाष्य करताना डॉ. भिसे यांनी स्पष्ट केले की, “अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांनी संपूर्ण मानवतेचा विचार केला. महापुरुष हे कोणत्याही एका जातीचे नसून संपूर्ण अखिल मानवजातीचे असतात. अण्णाभाऊंचे साहित्य हे केवळ एका समाजाचे नसून त्यात सामाजिक न्याय, समता आणि बंधुभाव ही मूल्ये जपली गेली आहेत.”
जयंतीच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना त्यांनी, “जयंती म्हणजे केवळ नाचणे किंवा मिरवणूक नसून महापुरुषांचे विचार डोक्यात आणि आचरणात घेणे हीच खरी अभिवादन ठरेल,” असेही नमूद केले.
अध्यक्षीय भाषणातून विलास लांडगे म्हणाले, “अण्णाभाऊंच्या साहित्यातून न्याय्य, समतामूलक आणि बंधुभावाने नटलेला समाज निर्माण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. ‘तुझे दुःख ते माझे दुःख’ ही भावना निर्माण झाली, तरच खरी समरसता निर्माण होईल.”
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीत आणि संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने झाली, तर सांगता ‘वंदे मातरम्’ने करण्यात आली.
या प्रसंगी व्यासपीठावर माळेगाव नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुयोग सातपुते, विरोधी पक्षनेते आरती शेंडगे, जेजुरी देवस्थानाचे विश्वस्त अनिल सौंदडे, सामाजिक कार्यकर्ते के. टी. जाधव, दीपकजी पेशवे, विक्रम थोरात आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम थोरात यांनी केले, सूत्रसंचालन प्रशांत सरतापे यांनी तर गणेश थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर साठे, नितीन चव्हाण, गणेश जाधव, आनंद लोंढे, सोमनाथ सूर्यवंशी, किरण दंडवते यांनी विशेष परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

