news
Home पिंपरी चिंचवड शिवछत्रपतींच्या वारसा संवर्धनासाठी PCMC चा पुढाकार; ‘दुर्गोत्सव २०२५’ मध्ये युनेस्को वारसा स्थळ किल्ल्यांची प्रतिकृती बनवा

शिवछत्रपतींच्या वारसा संवर्धनासाठी PCMC चा पुढाकार; ‘दुर्गोत्सव २०२५’ मध्ये युनेस्को वारसा स्थळ किल्ल्यांची प्रतिकृती बनवा

आयुक्त श्रावण हर्डीकर, उपायुक्त अण्णा बोदडे यांचे आवाहन; नव्या पिढीत इतिहास, शौर्य आणि संस्कृतीची जाणीव निर्माण करण्याचे उद्दिष्ट. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

युनेस्कोच्या ‘वारसा स्थळ’ किल्ल्यांवर आधारित! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून भव्य ‘दुर्गोत्सव २०२५’ स्पर्धेचे आयोजन

 


 

दिवाळीत पर्यावरणपूरक किल्ल्यांचे मॉडेल बनवा; महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांसह १२ दुर्गांच्या प्रतिकृतींना सन्मान, सहभागींना मुख्यमंत्र्यांचे ई-सन्मानपत्र

 

पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २४ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी दिवाळी काळात राज्यभरात किल्ल्यांची उभारणी केली जाते. या परंपरेतून बालकांपासून प्रौढांपर्यंत सर्वांमध्ये इतिहास, शौर्य आणि संस्कृतीची जाणीव निर्माण होते. या पारंपरिक उपक्रमाला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्रातील ११ ऐतिहासिक किल्ल्यांचा आणि तामिळनाडूतील किल्ल्याचा अशा एकूण १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे. हा सन्मान महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘दुर्गोत्सव २०२५’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. पिंपरी, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या या उपक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान निर्माण व्हावा, तसेच पर्यावरणपूरक साहित्य वापरून किल्ल्यांची उभारणी व्हावी या उद्देशाने यंदा ‘दुर्गोत्सव’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झालेल्या किल्ल्यांपैकी एखाद्या किल्ल्याचे मॉडेल आपल्या घरात, अंगणात, बाल्कनीत किंवा सोसायटीच्या चौकात तयार करावे.
तयार केलेल्या किल्ल्यांचे छायाचित्र काढून ते ‘दुर्गोत्सव २०२५’ साठी उपलब्ध करून दिलेल्या बारकोडद्वारे स्कॅन करून अपलोड करावे. निर्धारित कालावधीत अपलोड केलेल्या नोंदींच्या आधारे प्रत्येक सहभागीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ताक्षराचे सन्मानपत्र (e-Certificate) प्रदान करण्यात येईल.

श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा संदेश:

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा आपला अभिमान आहे. ‘दुर्गोत्सव २०२५’ च्या माध्यमातून आपण या वारशांचे संवर्धन करत नव्या पिढीमध्ये इतिहासाबद्दल आदर आणि प्रेरणा निर्माण करूया. या सर्व उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि इतिहासप्रेमाची भावना दृढ करण्याचे उद्दिष्ट चिंचवड महानगरपालिकेने ठेवले आहे.

अण्णा बोदडे, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा संदेश:

आजच्या वेगवान जगात परंपरा जपण्याची जबाबदारी आपलीच आहे. शिवछत्रपतींच्या दुर्गांची प्रतिकृती तयार करण्याचा उपक्रम हा केवळ कलात्मक प्रयत्न नाही, तर आपल्या मुलांना इतिहासाशी, संस्कृतीशी आणि मातृभूमीशी जोडणारा दुवा आहे. या माध्यमातून आपण पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या अभिमानाला पुन्हा नवजीवन देत आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!