१.१३ कोटींचा दरोडा आणि राजकीय वादळ! दरोडेखोरांना वाचवण्यासाठी पोलिसांवर ‘वरिष्ठांचा’ दबाव?
माजी नगरसेविका जयश्री गावडे यांचा थेट आरोप; ‘राजकीय पदाधिकारी महिले’चे नाव वगळल्याने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ
पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३० ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे यांच्या चिंचवड येथील गावडे पार्क येथील बंगल्यावर रविवारी (दि. २६) सकाळी ७ वाजता दहा ते अकरा जणांनी दरोडा टाकून १ कोटी १३ लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम पळवून नेल्याचा गंभीर आरोप गावडे यांनी केला आहे. या दरोड्याचा प्रकार घडून चार दिवस उलटले तरी दरोडेखोर मोकाट असून, पोलिसांच्या भूमिकेवर राजकीय दबाव असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या दरोड्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गावडे यांच्या घरातील कामगार ज्ञानेश्वर सर्जेराव पवार (वय ३१) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अकरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. परंतु, दरोड्याचा कट रचणाऱ्या निगडी प्राधिकरणातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी महिलेचे नाव पोलिसांनी तक्रारीतून वगळल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेविका जयश्री गावडे यांनी केला आहे.
- या पदाधिकारी महिलेने वरीष्ठ पातळीवरील राजकीय व्यक्तीचा पोलिसांवर दबाव आणल्याची चर्चा संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात सुरू आहे.
- ती राजकीय पदाधिकारी महिला नेमकी कोण आहे आणि तिला पाठीशी घालण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणारा वरिष्ठ नेता कोण, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
दरोडा टाकल्यानंतर, याच राजकीय पदाधिकारी महिलेने श्रीनिवास कलाटे यांच्या गाडीतून घाईघाईने पळ काढला. या गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या काही महिलांना धडक दिली, ज्यात त्या महिला जखमी झाल्या.
- या जखमी महिला, तक्रार देण्यासाठी चिंचवड पोलीस ठाण्यात गेल्या असता, पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास विरोध केला.
- राजकीय पदाधिकाऱ्याच्या दबावामुळेच पोलीस त्यांची तक्रार घेत नसल्याचा आरोप या जखमी महिलांनी केला आहे. त्या आता न्यायासाठी अनुसूचित जाती (SC) आयोगात दाद मागणार असल्याची माहिती मिळत आहे.
माजी नगरसेविका जयश्री गावडे यांनी दोन दिवसांनंतर घरी परतल्यावर घराची तपासणी केली असता, सोन्या-चांदीचे दागिने, देवघरातील देवाच्या महागड्या मूर्ती आणि रोख रक्कम मिळून १ कोटी १३ लाख रुपयांचा ऐवज लुटल्याचे निदर्शनास आले.
- सीसीटीव्ही डिव्हीआर पसार: दरोड्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी तेजस्विनी कदम हिने सीसीटीव्हीचा डीव्हीआर (DVR) काढून पसार केल्याचा दावा देखील जयश्री गावडे यांनी तक्रारीत केला आहे.
- दरोड्याचा घटनाक्रम (पोलिसांच्या माहितीनुसार): मंगळवारी (दि. २२) गावडे कुटुंब बाहेर होते. रविवारी (दि. २६) सकाळी कामगार ज्ञानेश्वर पवार दरवाजा उघडून मोटार चालू करण्यासाठी जात असताना आशिष गावडे, अमित गावडे यांनी त्यांना धक्का देऊन पाडले. त्यानंतर गणेश सकाटे, योगेश गायकवाड, श्रीनिवास कलाटे यांनी ज्ञानेश्वर यांना बेदम मारहाण केली. योगेश गायकवाड, अतुल गीरमे, चालक काक्या आणि दहा ते बारा बाऊन्सर घरात घुसले आणि घरातील साहित्य बाहेर फेकले. त्यानंतर धमकी देऊन गाड्यांच्या चाव्या घेऊन, गावडे यांच्या गाड्या बंगल्याबाहेर काढल्या.
या प्रकरणाशी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनूप मोरे यांचा कसलाही संबंध नसताना त्यांना गोवण्याचा प्रकार पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप आहे.
- अनूप मोरे यांनी स्पष्टीकरण दिले की, “मी केवळ घटनास्थळी उपस्थित होतो आणि त्यावेळी पोलीसही तिथे होते. माझ्या नावाचा तक्रारीत उल्लेख करून बदनामी करण्याचे षडयंत्र राजकीय पदाधिकारी महिलेने पोलिसांच्या मदतीने रचले आहे. या प्रकरणाशी माझा काडीमात्रही संबंध नाही.”
- पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे आणि ते कोणाच्या दबावाला बळी पडून हे कारस्थान करत आहेत, असा प्रश्न जयश्री गावडे यांनी उपस्थित केला आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
