बिहारच्या राजकारणाचे बदललेले प्राधान्यक्रम: प्रशांत किशोर ‘झिरो’ तर मैथिली ठाकूर ‘हिरो’ का?
२५ वर्षीय गायिकेला थेट विधानसभेची उमेदवारी; निष्ठावान कार्यकर्त्यांच्या योगदानाचा प्रश्न!
दिल्ली प्रतिनिधी मॅक्स मंथन डेली न्यूज, दि. २० नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
देशातील सर्वाधिक मागास आणि गरिबीने ग्रासलेले राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहारमध्ये सध्या राजकारणाचा पोत बदलल्याची चर्चा सुरू आहे. बिहारमधील सुमारे १३ कोटी लोकसंख्येपैकी साडेतीन कोटींहून अधिक नागरिक चांगल्या भविष्याच्या आणि रोजगाराच्या शोधात राज्य सोडून इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. या गंभीर परिस्थितीत, बिहारच्या राजकारणात दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे आणि त्यांच्या यशापयशाची तुलना होत आहे: प्रशांत किशोर आणि मैथिली ठाकूर.
राज्याच्या मूळ समस्यांवर काम करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी जनसुराजच्या माध्यमातून मोठे अभियान उभे केले. त्यांनी चांगल्या शिक्षणाचे आश्वासन दिले, राज्यात रोजगार निर्माण करण्याची, पलायन थांबवण्यासाठी कंपनी आणि कारखाने उभे करण्याची व्यवस्था करण्याचे स्वप्न पाहिले. एकंदरीत, बिहारला स्वावलंबी बनवण्यासाठी हा माणूस दिवस-रात्र पदयात्रेतून फिरला.
मात्र, अलीकडील निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पदरी झिरो यश आले. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही, उलट २३६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. बिहारच्या विकासाचे मूलभूत प्रश्न घेऊन पदयात्रा करणारा नेता मतदारांना आकर्षित करू शकला नाही, ही राजकीय निरीक्षकांसाठी चिंतेची बाब आहे.
याउलट, दुसरीकडे गायिका मैथिली ठाकूर (वय २५ वर्षे) हिला भाजपने बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभेची उमेदवारी दिली आणि ती विजयी झाली.
या यशामागील मूळ प्रश्न असा आहे की, २५ वर्षांच्या मैथिलीने असे कोणते मोठे काम केले होते, ज्यामुळे भाजपने तिला उमेदवारी दिली आणि लोकांनी निवडून दिले?
-
ती निवडणूक लागण्याच्या अवघ्या एक महिना अगोदर मतदार संघात आली.
-
तिचे संपूर्ण कुटुंब अनेक वर्षांपूर्वीच बिहार सोडून गेले होते.
-
तिने कधी शेतकऱ्यांसाठी, चांगल्या शिक्षणासाठी मोर्चात सहभाग घेतला? बिहारमधील पलायन थांबावे किंवा रोजगाराचे प्रश्न सुटावेत म्हणून ती रस्त्यावर उतरली?
तिचे योगदान केवळ आपल्या फेव्हरमध्ये गाणी गाणे आणि पक्षाच्या विचारधारेवर कला सादर करणे इतकेच राहिले. केवळ गायन कलेच्या आधारावर थेट विधानसभेची उमेदवारी देणे, हे एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे धोरण इतके हलके कसे असू शकते? गेली १५, २०, २५ वर्षांपासून त्याच मतदारसंघात पक्ष वाढवण्यासाठी काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या कामाचे काय?
आजही भारतीय राजकारणात सामान्य घरातील तरुण, ज्यांनी संपूर्ण आयुष्य आंदोलन, मोर्चे, धरणे यांमध्ये लाठ्या-काठ्या खात घालवले आहे, त्यांना साधं जिल्हा परिषदेसाठी देखील कुठला पक्ष तिकीट देत नाही आणि दिलेच तर लोक निवडून देत नाहीत. याउलट, एखादी २५ वर्षांची मुलगी केवळ सोशल मीडियावर लोकप्रिय आहे म्हणून तिला थेट आमदार केले जात असेल, तर भारतीय राजकारणाचा पोत आणि दर्जा काय असेल हे वेगळे सांगायची गरज नाही.
मैथिली ठाकूर ज्या अलीनगर मतदारसंघातून निवडून आली आहे, तिला त्या परिसराची कोणतीही माहिती नाही. याचा पुरावा म्हणजे निवडून आल्यावर मतदारसंघाचे नाव बदलण्याची भाषा तिने केली होती, तेव्हाच तिच्या राजकीय दर्जेची कल्पना आली होती. कॉलेज राजकारण, विद्यापीठ राजकारण आणि चळवळीच्या राजकारणातून पुढे आलेल्या असंख्य मुली आहेत, ज्यांची ना कुठला पक्ष दखल घेतोय, ना मतदार.
राजकारणाचा आणि राजकीय पक्षांचा हा जो प्राधान्यक्रम केवळ लोकप्रियतेवर आधारित बदलला आहे, तो पक्षांसाठी फायदेशीर ठरत असला तरी, राज्यांसाठी आणि या देशासाठी नक्कीच घातक आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
