‘एकही मत वाया जाऊ नये!’ मूर्तिजापूर शहरात मतदार जनजागृती रॅलीचा गगनभेदी घोष
नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनाचा उत्स्फूर्त सहभाग; लोकशाहीच्या उत्सवाचा संदेश
मुर्तीजापुर, प्रतिनिधी दीपक अ. थोरात, दि. २२ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
लोकशाहीच्या पायाला बळकटी देण्यासाठी मूर्तिजापूर नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मतदार जनजागृती रॅलीने आज संपूर्ण शहर अक्षरशः दुमदुमून गेले. “एकही मत वाया जाऊ नये” हे ध्येय घेऊन विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि नागरिकांनी एकत्र येत या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलेश जाधव, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शिल्पा बोबडे, गटशिक्षणाधिकारी वैशाली रामटेके यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष औचित्य प्राप्त झाले.
शहरातील मूर्तिजापूर हायस्कूल, गुलामनबी आझाद विद्यालय, स्वर्गीय परमानंद मालानी विद्यालय, भारतीय ज्ञानपीठ विद्यालय आणि गाडगे महाराज विद्यालय येथील विद्यार्थी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “१००% मतदान करा”, “तुमचे एक मत तुमचा हक्क” अशा घोषणांनी शहराचा प्रत्येक कोपरा दुमदुमून गेला.
विशेष म्हणजे, आठवडी बाजाराच्या दिवशी रॅली काढून “सुवर्णसंधीचा लाभ घेणे” हा हेतू यशस्वीपणे साध्य करण्यात आला. गर्दीच्या बाजारपेठेतून जात असताना विद्यार्थ्यांनी जागोजागी नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावले आणि “लोकशाहीचा उत्सव हा सर्वांचा” असा प्रभावी संदेश दिला.
या उपक्रमात शाळेतील शिक्षक, स्वीप समितीचे अधिकारी-कर्मचारी, बचत गटांच्या महिला तसेच नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “एकीचे बळ मोठे” या भावनेने सर्वांनी रॅली यशस्वी करण्यासाठी हातभार लावला.
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी गटशिक्षणाधिकारी वैशाली रामटेके आणि नगर परिषदचे स्वीप समिती प्रमुख राजेश भुगुल यांच्या मार्गदर्शनाखाली मोहम्मद अली, ज्ञानेश ताले आणि रुबीना मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. “मतदान हा केवळ अधिकार नसून जबाबदारी आहे” हा संदेश जनतेच्या मनात रुजविण्याचा नगर परिषदेचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
