१२ तासांत गुन्हे शाखा युनिट ३ ची धडाकेबाज कामगिरी! ३ आरोपी आणि २ अल्पवयीन ताब्यात
मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम चोरणारे आरोपी गजाआड; ४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवडमधील आळंदी पोलीस स्टेशन हद्दीत मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम चोरून घेऊन गंभीर दुखापत करणाऱ्या तीन आरोपींना आणि दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखा युनिट-३ (Unit-3) च्या पथकाने अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले आहे.
दिनांक ३१/११/२०२५ रोजी आळंदी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.रजि. क्र. ६५३/२०२५ भा.न्या.सं. कलम १४०(१), ११८(१), ३११, ३१०(५), ११५(२), ३५२, ३५१ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये दाखल गुन्ह्याबाबत ही कामगिरी करण्यात आली.
या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस निरीक्षक संतोष कसबे व स्टाफ यांनी सुरू केला होता.
घटनेच्या ठिकाणावरील सी.सी.टी.व्ही. फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, हा गुन्हा सुबोध मल्हारी कांबळे (वय २० वर्षे, रा. श्रीराम कॉलनी, आळंदी रोड, भोसरी, पुणे) याने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरीत सापळा लावून सुबोध कांबळे याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान, आरोपी सुबोध कांबळे याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याने त्याचे इतर ४ साथीदार (१) ओंकार संजय कांबळे (वय १८ वर्ष, रा. दिघी), (२) सूरज महादेव शिंदे (वय १९ वर्ष, रा. भोसरी) आणि दोन अल्पवयीन साथीदार यांच्यासह हा गुन्हा केल्याचे सांगितले.
आरोपींनी सांगितले की, रस्त्यावरून जाण्यावरून झालेल्या वादातून त्यांनी फिर्यादी सुदर्शन महादेव आडे आणि फिर्यादीचा मित्र (१) विकास अर्जून सोनकांबळे व (२) संतोष भाऊसाहेब हांबर्डे यांना मारहाण केली. मारहाण करून त्यांचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरून नेले.
आरोपींनी फिर्यादी सुदर्शन महादेव आडे आणि मित्र संतोष भाऊसाहेब हांबर्डे यांना आळंदी बाजूकडून चाकणकडे जाणाऱ्या रोडवर जंगलामध्ये मारहाण करून सोडले आणि त्यांच्याकडून रु. ५००/- रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन काढून घेतले.
या गुन्ह्यात एकूण रु. ४,०७,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आळंदी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो., मा. पोलीस सह आयुक्त श्री. डॉ. शशिकांत महावरकर सो., मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड सो., मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. डॉ. शिवाजी पवार सो., सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. डॉ. विशाल हिरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व सूचनांप्रमाणे करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक जावळे, पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस अंमलदार गवळी, रुपनवर, कोळेकर, नांगरे, फापाळे, भांगले व थोरात यांनी सदरची कामगिरी यशस्वी केली आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
