मोरयांच्या संजीवन समाधी सोहळ्यात सुगम संगीत रजनीची मेजवानी; रसिकांनी अनुभवला अविस्मरणीय आनंद
संदीप उबाळे आणि योगिता गोडबोले यांच्या सुश्राव्य गायनाने मोरया रसिक तृप्त; ‘तुज मागतो मी आता’ गाण्याने झाली मैफिलीची सुरुवात
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ७ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवडवासीयांचे आणि समस्त गणेशभक्तांचे दैवत असलेल्या महासाधू मोरया गोसावी यांच्या ४६४ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या महोत्सवाला काल (दि. ७ डिसेंबर २०२५) मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सेवा सुगम संगीताच्या रूपात स्थानिक, पण आपल्या दैवी देणगीने नावारूपाला आलेल्या संदीप उबाळे आणि योगिता गोडबोले या गायक जोडीने आपल्या सुश्राव्य गायनाने मोरया चरणी रुजू केली आणि रसिकांना मनमुराद आनंद दिला.
या संगीत रजनीसाठी पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, जितेंद्र देव, केशव विद्वांस हे आणि रसिक तसेच यजमान म्हणून संपूर्ण वेळ कार्यक्रमास उपस्थित होते.
या मैफिलीत मराठी आणि हिंदी अशा मिश्र गाण्यांची मेजवानी रसिकांना पहिल्याच दिवशी अनुभवता आली. संदीप उबाळे आणि योगिता गोडबोले या दोघांनी एकाहून एक सुंदर आणि अवीट गाणी सादर करत आपल्या गायनाची कमाल दाखवली.
-
योगिता गोडबोले यांनी टेलिव्हिजनच्या माध्यमातून अल्पवधीतच लोकप्रिय झालेल्या ‘तुज मागतो मी आता’ या गाण्याने सेवेची सुरुवात केली आणि उपस्थित मोरया भक्तांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर तिने गायलेल्या ‘माय भवानी तुझे लेकरू’ या गाण्यालाही उत्स्फूर्त दाद मिळाली. योगिता गोडबोले यांनी ‘कजरा मोहब्बतवाला’ हे आशाताई आणि शमशाद बेगम यांच्या आवाजातील गाणे एकटीने सादर करत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली.
-
मूळचे आकुर्डीचे असलेले, पण आता आपल्या जबरदस्त गायनशैलीने भारताचा लाडका गायक झालेल्या संदीप उबाळे यांनी ‘मन मंदीरा’ या गाण्याने आपल्या गायनाची सुरेख अनुभूती उपस्थित रसिक प्रेक्षकांना दिली.
-
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेच्या शीर्षक गीताचा गायक असलेल्या संदीप उबाळे यांनी ‘छावा’ हे गीत उभे राहून सादर करताच तमाम श्रोत्यांनी त्याला जोरदार दाद दिली.
या जोडीने ‘नावाची गोजिरी’, ‘मला वेड लागले’, ‘देवा काळजी रे’, ‘यारा सिली सिली’, ‘अभी मुझमे कही’, ‘मेरे ढोलना सून’, ‘ये राते ये मौसम’ अशा अनेक अजरामर गाण्याचे सादरीकरण करत ही संगीत रजनी खूपच उंचावर नेली.
पुण्यात थंडी असतानाही रसिक श्रोते मंडपातून हलत नव्हते. शेवटी, संदीप उबाळे यांनी ‘देवा श्री गणेशा’ हे गीत भन्नाटरित्या सादर करत संपूर्ण प्रेक्षकांना यात समाविष्ट करून या मैफिलीची उंची वाढवली.
प्राजक्ता मांडके यांनी अतिशय रसाळ सूत्रसंचालन करत मैफिलीत आणखीनच जान आणली. प्रत्येक गाण्याबद्दल कमी आणि अचूक शब्दात माहिती सांगण्याचे त्यांचे कसब निव्वळ लाजवाब होते.
या मैफिलीसाठी हार्मोनियम वर प्रसन्न बाम, सिंथेसायजरवर अनय गाडगीळ, तबला आणि ढोलकीवर नितीन शिंदे, तर रिदम मशीन आणि ऑक्टोपॉडवर अभय इंगळे या सहकलाकारांनी त्यांना उत्तम साथ दिली.
‘पुन्हा या’ अशी आग्रहाची विनंती करत आयोजकांच्या वतीने सर्व कलाकारांचा यथायोग्य सन्मान करत या मैफिलीची सांगता झाली.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
