‘राष्ट्र प्रथम…नंतर पार्टी अन् शेवटी स्वत:’ भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी कृतीतून जपला पक्षाचा आदर्श
महापालिका निवडणुकीसाठी ६५० हून अधिक इच्छुकांनी घेतले अर्ज; शिस्त पाळत शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनीही रितसर भरला उमेदवारी अर्ज
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ७ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून (BJP) उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज वितरणाच्या आज (रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५) शेवटच्या दिवशी ६५० हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनीसुद्धा पक्षाच्या शिष्टाचाराप्रमाणे (Protocol) स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचा अर्ज रितसर घेतला आहे. या कृतीतून त्यांनी “राष्ट्र प्रथम…नंतर पार्टी अन् शेवटी स्वत:’’ हे पक्षाचे धोरण अधोरेखित केले आहे, ज्यामुळे “लार्जर दॅन पार्टी” भूमिका घेणाऱ्या काही इच्छुकांच्या डोळ्यांत अंजन घालण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत झाल्यानंतर, भाजपा नेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात आढावा बैठक घेतली होती. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार, इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेऊन ते निर्धारित वेळेत पक्ष कार्यालयात जमा करावेत, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या होत्या.
पिंपरी येथील मोरवाडीतील जनसंपर्क कार्यालयातून आतापर्यंत ६५० हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी अर्ज न घेतलेल्या उर्वरित इच्छुकांना निर्धारित वेळेत अर्ज घेण्याचे आवाहन केले आहे.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आपला बालेकिल्ला असलेल्या महानगरपालिका प्रभाग क्रमांक २८ (फाईव्ह गार्डन, शिवार गॉर्डन, प्लॅनेट मिलेनीयम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, रोझ आयकॉन, गोविंद गार्डन) येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
शत्रुघ्न काटे यांनी शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत २०० हून अधिक कार्यक्रम व उपक्रम घेतले असून, ‘प्रभावी संघटन, जनसेवा, पक्षनिष्ठा आणि शेवटच्या घटकांचा विकास’ या चार सूत्रांवर त्यांनी काम केले आहे. राज्य स्तरावर त्यांच्या कार्यपद्धतीची विशेष नोंद घेण्यात आली आहे.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले, “भाजपा शिस्तप्रिय पक्ष आहे. निवडणूक असो किंवा संघटन, पक्ष शिष्टाचार हा शिरोभागी असतो. मी प्रभाग २८ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने पक्षाच्या कार्यप्रणालीनुसार इच्छुक उमेदवारी अर्ज घेतला आहे.”
ते पुढे म्हणाले, “बहुतांशी इच्छुकांनी अर्ज घेतलेले आहेत. उर्वरित उमेदवारांनीसुद्धा अर्ज घेऊन निर्धारित मुदतीमध्ये जमा करावेत. ऐनवेळी आलेल्या अर्जांचा विचार होणार नाही. त्यानंतर पक्षाचे गोपनीय सर्व्हे, निवडून येण्याची क्षमता आणि पक्ष कार्यातील सक्रियता याच्या आधारे पक्षश्रेष्ठी उमेदवारी निश्चित करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड महापालिकेवर ‘कमळ’ फुलेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
