news
Home पिंपरी चिंचवड ‘स्पा’ मधील अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांची मोठी मोहीम; आस्थापनांचा परवाना रद्द करून होणार ‘सील’

‘स्पा’ मधील अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांची मोठी मोहीम; आस्थापनांचा परवाना रद्द करून होणार ‘सील’

वर्षभरात २८ सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या पथकाची पिंपळे निलखमध्ये कारवाई, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA) गुन्हा दाखल. (@२०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपळे निलखमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली सुरू असणाऱ्या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, दोन जणांना अटक


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड/पिंपळे निलख : पिंपरी-चिंचवड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर देहविक्री व्यवसायावर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पिंपळे निलख परिसरातील एका स्पा सेंटरवर सोमवारी रात्री उशिरा छापा टाकून पोलिसांनी एका महिला चालकासह व्यवस्थापकाला अटक केली आहे. या कारवाईत देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आलेल्या चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथील एका स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची टीप गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून या स्पावर छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून मॅनेजर आणि महिला चालकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून गुन्हे शाखेने अशा प्रकारच्या अनैतिक व्यवसायांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. गेल्या महिन्यातच निगडी येथील स्पा आणि आळंदी येथील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवडच्या विविध भागांतून तब्बल २८ सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये ४५ आरोपींना अटक करण्यात आली असून ६३ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

अनैतिक व्यवसायात गुंतलेल्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. गेल्या महिन्यातच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दोन स्पा आणि एका लॉजचा परवाना रद्द करून ते सील करण्याचे आदेश दिले होते. वर्षभरात अशा ८ आस्थापनांवर सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी देहविक्रीसाठी प्रवृत्त करणाऱ्या १०७ महिलांवरही ७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांची ही कारवाई भविष्यातही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!