पिंपळे सौदागरच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची गरज; गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी कुंदा भिसे यांचा पाठपुरावा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: २९ मार्च २०२६,© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपळे सौदागर परिसरातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढती नागरी वसाहत आणि त्यानुसार वाढणाऱ्या सुरक्षाविषयक गरजा लक्षात घेता, या भागात स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका कुंदा संजय भिसे यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.
पिंपळे सौदागर हा परिसर गेल्या दशकात वेगाने विकसित झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणावर आयटी कर्मचारी, व्यावसायिक आणि उच्चभ्रू नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, वाढत्या शहरीकरणासोबतच परिसरात घरफोडी, वाहन चोरी, साखळी चोरी आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. सध्या या संपूर्ण परिसराचा भार सांगवी पोलीस स्टेशनवर आहे. सांगवी पोलीस स्टेशन आणि पिंपळे सौदागर मधील अंतर, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी यामुळे पोलिसांना घटनास्थळी वेळेत पोहोचण्यात अडचणी येतात. या भौगोलिक अंतराचा फायदा अनेकदा गुन्हेगार घेताना दिसत असून, स्वतंत्र पोलीस ठाणे झाल्यास गस्त वाढवणे आणि गुन्हेगारांवर वचक बसवणे सोपे होणार आहे.
पिंपळे सौदागरमधील नागरिकांना तक्रार नोंदवणे, चारित्र्य पडताळणी किंवा इतर पोलीस कामांसाठी सांगवीला जावे लागते. यामध्ये मोठा वेळ आणि श्रम वाया जातात. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पोलीस मदत मिळण्यात अडथळे येत आहेत. स्थानिक स्तरावर पोलीस चौकी असली तरी, पूर्ण क्षमतेचे पोलीस स्टेशन नसल्याने तपासाच्या कामात मर्यादा येतात.
या निवेदनात कुंदा भिसे यांनी म्हटले आहे की, “पिंपळे सौदागर हा वेगाने विकसित होणारा परिसर असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी व सोयीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना लांब अंतर पार करून सांगवी पोलीस स्टेशनला जावे लागणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच पोलीस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा पाठपुरावा सुरू आहे.”
स्वतंत्र पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीची योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखता येईल. या महत्त्वाच्या विषयावर भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे तसेच सहयोगी नगरसेविका अनिता संदीप काटे यांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक भूमिका दर्शविली असून, लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे पिंपळे सौदागरमधील गुन्हेगारीला लगाम बसेल आणि नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
