वसुधाताईंचे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती, प्रतिनिधी विलास सावळे,दिनांक: २९ मार्च २०२६, © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज
अमरावती: माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत केवळ सत्ताकारण न करता समाजकारणाचा वारसा खऱ्या अर्थाने जपला आहे. त्यांनी महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी केलेल्या कार्य कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे कार्य आणि अनुभव आजच्या तरुण पिढीसाठी एका दीपस्तंभासारखा प्रेरणादायी आहे, असे गौरवपूर्ण उद्गार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल वसुधाताई देशमुख यांना श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित सोहळ्यात ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखेडे, आमदार जयंत पाटील, सुलभा खोडके, संजय खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, माजी मंत्री अनिल देशमुख, विलास इंगोले यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, ग्रामीण भागाचा विकास आणि महिला सक्षमीकरण हे वसुधाताईंच्या कार्याचे मुख्य केंद्रबिंदू राहिले असून हा पुरस्कार त्यांच्या तपोनिष्ठ सेवेची समाजाने घेतलेली दखल आहे. ताईंच्या प्रेरणेमुळे आज विदर्भातील महिला आत्मनिर्भर होऊन काम करीत आहेत. विदर्भाच्या विकासासाठी वसुधाताई आयुष्यभर झटल्या असून त्यांनी रचलेल्या पायाचा कळस पूर्ण करण्याचे कार्य मी पूर्ण करेल. त्यांचे अमरावतीच्या विकासासाठी अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.
पुरस्काराला उत्तर देताना वसुधाताई देशमुख म्हणाल्या की, हा ‘जीवनगौरव’ पुरस्कार म्हणजे केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून, गेल्या अनेक दशकांपासून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना समाजाचे ऋण फेडणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे सांगून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेचे व्रत अखंडपणे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सोहळ्यात अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील दहयांद्री गावातील ‘रुक्मिणी’ या मुलींच्या नवीन वसतीगृह इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रा. नवनीत देशमुख लिखित वसुधाताईंच्या जीवनप्रवासावर आधारित ‘वसुधा’ या कादंबरीचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे संचालन शिप्रा मानकर यांनी केले तर प्रा. विनय वसुले यांनी आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
