पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचा हातोडा; रेड झोन आणि पूररेषेतील बांधकामे जमीनदोस्त
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाने अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. मागील काही दिवसांत भोसरी, दिघी आणि मोशी परिसरातील रेड झोन तसेच नदीच्या पूररेषेने बाधित असलेल्या २५ हजार चौ.फुटांहून अधिक बांधकामांवर निष्कासनाची (पाडकाम) मोठी कारवाई करण्यात आली.
१. भोसरी व दिघी (रेड झोन):
१ एप्रिल रोजी प्रभाग क्र. ३ मधील चक्रपाणी वसाहत (भोसरी) आणि प्रभाग क्र. ४ दिघी येथील रेड झोनमधील एकूण ४ अनधिकृत आर.सी.सी. बांधकामांवर कारवाई करण्यात आली. याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ४,५०० चौ.फूट होते. त्यानंतर ११ एप्रिल रोजी पुन्हा याच भागात आणखी ५ बांधकामे पाडण्यात आली, ज्याचे क्षेत्रफळ ६,१५० चौ.फूट इतके आहे.
२. मोशी (पूररेषा व नाला परिसर):
१० एप्रिल रोजी मोशी येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेतील बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला. तसेच मोशी टोलनाका परिसर आणि दक्षिण लक्ष्मीनगर येथील नाल्यालगत असलेल्या एकूण ११ अनधिकृत पत्राशेड व आर.सी.सी. बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या एकाच दिवशी सुमारे १४,६५१ चौ.फूट क्षेत्रफळावरील बांधकामे हटविण्यात आली.
क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे आणि कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग तसेच ‘इ’ क्षेत्रीय धडक कारवाई पथकाने ही कामगिरी बजावली.
या मोहिमेत उपअभियंता विनायक माने, कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य, क्षितिजा देशमुख यांच्या अधिपत्याखाली अतिक्रमण पथकाने काम केले. यावेळी कार्यालय अधीक्षक संजय घुले, अतिक्रमण निरीक्षक प्रविण लांडे, बीट निरीक्षक सचिन पाटील, आदिनाथ नागरे, दत्तात्रय छडीदार, शिवानी भगत, भाग्यश्री वंजारे तसेच एम.एस.एफ. जवान आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
शहरातील नदीपात्र, पूररेषा आणि रेड झोनमध्ये अनधिकृत बांधकामे करू नयेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने वेळोवेळी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा बांधकामांविरोधात आगामी काळातही ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


