बडनेरा येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त विज्ञानाचा जागर; अंधश्रद्धेविरुद्ध महिलांचे संघटन आणि भोंदूगिरीचा निषेध
बडनेरा प्रतिनिधी, १३ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
बडनेरा: माताफैल, जुनी वस्ती येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) बडनेरा शहर शाखेच्या वतीने महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक प्रबोधनाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी मार्गदर्शन सभा, जनजागृती प्रदर्शनी आणि चवदार तळे सत्याग्रह पत्रक वाटप कार्यक्रमाला महिलांनी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते महादेव मेश्राम होते, तर प्रास्ताविक दिलीप लाडे यांनी केले.
मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले ‘अंनिस’चे जिल्हा प्रधानसचिव विजय डवरे यांनी महिलांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. “महिलांनी फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून विज्ञाननिष्ठ आणि विवेकशील जीवन जगावे,” असे ते म्हणाले. विजया घोडेस्वार यांनी गावागावात महिलांचे संघटन उभे करून ‘अंनिस’च्या शाखा सुरू करण्याची गरज व्यक्त केली. प्रफुल मंदा यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेत महिलांना सामाजिक परिवर्तनात सक्रिय होण्याचे मार्गदर्शन केले.
यावेळी समाजमंदिर परिसरात महात्मा फुले, समता चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन आणि संविधान मूल्यांवर आधारित अभ्यासपूर्ण प्रदर्शनी लावण्यात आली होती. तसेच महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाची माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमानंतर माताफैल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सर्व महिला आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ‘भोंदू खरात’ यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. समाजात पसरणाऱ्या भोंदूगिरीला थारा देऊ नका, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला सरिता लाडे, नूतन वासनिक, रेहमत शहा, वैशाली राऊळ, अनुपमा गोंडाने यांच्यासह उमा इंगोले, रमा मोहोड, कुमुद मेश्राम, मोनाली तायडे, जयश्री गवळी, सुरेखा तायडे आणि शहरातील विविध वस्तीस्तर संघांच्या शेकडो महिला उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संविधान जागर अभियान, तसेच संकल्प, सावित्री, लोकसेवा, जनसेवा, बुद्धछाया वस्तीस्तर संघ आणि क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटनेचे विशेष सहकार्य लाभले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



