सांगवी-बोपोडी पुलाच्या सुशोभीकरणासाठी २१ कोटींची ‘उधळपट्टी’; मारुती भापकरांचा आयुक्तांना पत्राद्वारे भ्रष्टाचाराचा इशारा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १३ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सध्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असून, त्याचे ताजे उदाहरण सांगवी-बोपोडी जोडणाऱ्या पुलाच्या सुशोभीकरण प्रकरणात समोर आले आहे. ३२ कोटींच्या मूळ पुलासाठी चक्क २१ कोटी ८७ लाख रुपये केवळ ‘सुशोभीकरणा’वर खर्च करण्यात आले आहेत. या अवाढव्य खर्चात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला असून, त्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
२०२२ मध्ये मुळा नदीवर सांगवी ते बोपोडी जोडणाऱ्या पुलाचे काम ३२ कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात आले होते. या कामाला वारंवार मुदतवाढ देऊन मूळ खर्चातही वाढ करण्यात आली. त्यानंतर या पुलाच्या केवळ सुशोभीकरणासाठी २१ कोटी ८७ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. ७ एप्रिल २०२६ रोजी महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते या सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली असताना केवळ सजावटीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी करणे संशयास्पद असल्याचे भापकर यांनी नमूद केले आहे.
-
निविदा प्रक्रियेतील पारदर्शकता: सुशोभीकरणासाठी निविदा मागवल्या होत्या का? त्यांचा मंजूर दर आणि बाजारभावातील तफावत तपासली आहे का?
-
मटेरियलची किंमत: सुशोभीकरणासाठी वापरलेले आयटम आणि त्यांची प्रत्यक्ष किंमत याची तज्ज्ञांमार्फत तपासणी व्हावी.
-
आर्थिक परिस्थिती: ठेकेदारांची जुनी बिले देण्यास पैसे नसताना आणि महापालिका कर्जबाजारी असताना अशा पद्धतीचा खर्च करणे कितपत योग्य आहे?
गेल्या काही काळापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना अनेक आर्थिक प्रकरणांवरून वाद निर्माण झाले आहेत. ५२ कोटींच्या बिलांचे प्रकरण ताजे असतानाच आता पुलाच्या सुशोभीकरणाचे हे २१ कोटींचे प्रकरण समोर आले आहे. भापकर यांनी या पत्राद्वारे अप्रत्यक्षपणे भाजपच्या ‘भ्रष्टाचारमुक्त’ कारभाराच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महापालिकेत नवनिर्वाचित नगरसेवकांनी येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या ‘पांढऱ्या हत्ती’ ठरणाऱ्या प्रकल्पांवर लक्ष देणे गरजेचे आहे. निविदा प्रक्रिया, मोजमाप पुस्तिका (Measurement Book) आणि बिलांची सत्यता पडताळून पाहणे ही नगरसेवकांची जबाबदारी आहे. केवळ उद्घाटनात धन्यता न मानता, जनतेच्या कराचा पैसा योग्य ठिकाणी वापरला जातोय की नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मारुती भापकर यांनी या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून अपहाराची रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे. आता पालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

