पुणे: हत्येच्या उद्देशाने तरुणाचे अपहरण; उत्तर महाळुंगे पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ६ तासांत सुटका!
पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी आकाश कांबळे , मॅक्स मंथन डेली न्यूज, १३ एप्रिल २०२६
चाकण/महालुंगे: पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्याचा कट पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हाणून पाडला आहे. उत्तर महाळुंगे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ६ तासांत ६ आरोपींना बेड्या ठोकून ऋषीकेश ऊर्फ दाद्या दिलीप कल्हाटकर (रा. कोरेगाव बुद्रुक) याची सुखरूप सुटका केली.
दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९:०० च्या सुमारास वासुली (ता. खेड) येथील ॲमेझॉन कंपनीच्या गेटसमोरून ऋषीकेश कल्हाटकर याचे दोन चारचाकी गाड्यांतून आलेल्या टोळक्याने अपहरण केले. सागर जावळे आणि ओमकार चव्हाण यांनी आपल्या साथीदारांसह महिंद्रा थार आणि आय-१० कारमधून ऋषीकेशला जबरदस्तीने बसवून नेले. या घटनेची माहिती ‘डायडल ११२’ प्रणालीवर मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिवाजी पवार यांनी ३ तपास पथके तैनात केली. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी खेड येथील क्रीडा संकुल परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे सापळा रचून थार आणि आय-१० कार अडवली. झडती घेतली असता, गाडीत ऋषीकेशसह ६ आरोपी मिळून आले. त्यांच्याकडून लोखंडी कोयता, चाकू आणि दोन गावठी बनावटीची पिस्तूलं (५ जिवंत काडतुसांसह) जप्त करण्यात आली आहेत.
अटक केलेल्या आरोपींची नावे:
१. सागर बाळू जावळे (वय ३४, रा. कुरकुंडी, खेड)
२. नितीन संजय थिटे (वय २७, रा. रेटवडी, खेड)
३. सौरभ ऊर्फ सोन्या अनिल ढोरे (वय २८, रा. भांबुरवाडी, खेड)
४. अजय भारत गोपाळे (वय २३, रा. राजगुरूनगर)
५. कुणाल प्रशांत चव्हाण (वय २३, रा. राजगुरूनगर)
६. ओमकार दशरथ कोरडे (वय २४, रा. सांडभोरवाडी, खेड)
आरोपींचा मित्र शुभम काळे याची काही काळापूर्वी हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी ऋषीकेशचा चुलत भाऊ संदीप कल्हाटकर हा आरोपी आहे. संदीपच्या जामिनासाठी ऋषीकेश प्रयत्न करत असल्याने आरोपी त्याच्यावर चिडून होते. २०२४ मध्येही आरोपींनी ऋषीकेशवर ५ राऊंड फायर केले होते, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. तो गुन्हा मागे घ्यावा आणि ऋषीकेशचा काटा काढावा या उद्देशानेच हे अपहरण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, संदीप सावंत आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

