news
Home पिंपरी चिंचवड महापालिका शाळांचा बदलता चेहरा! पीसीएमसी पब्लिक स्कूलमध्ये रंगला चिमुरड्यांचा पदवीदान सोहळा

महापालिका शाळांचा बदलता चेहरा! पीसीएमसी पब्लिक स्कूलमध्ये रंगला चिमुरड्यांचा पदवीदान सोहळा

जाधववाडी येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलमध्ये चिमुरड्यांचा दीक्षांत समारंभ उत्साहात; बालवाडीतून पहिलीत प्रवेश करणाऱ्यांचे कौतुक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर; शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर यांचे प्रतिपादन

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , १३ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “बालवाडी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील पाया असून, याच टप्प्यावर मुलांमध्ये आत्मविश्वास आणि शिकण्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न देता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा विशेष भर आहे,” असे प्रतिपादन शिक्षण समितीच्या सभापती रविना आंगोळकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने जाधववाडी येथील पीसीएमसी पब्लिक स्कूल (साई जीवन, शाळा क्र. ८७) येथे बालवाडीतून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ‘दीक्षांत समारंभ’ मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी विधी समिती सभापती सुजाता बोराटे, नगरसदस्य राहुल जाधव यांच्यासह महापालिकेच्या प्रशासन अधिकारी संगिता बांगर, मुख्याध्यापक जयश्री गळीतकर, मुख्याध्यापिका मृगनयनी चव्हाण, पर्यवेक्षक प्रमिला जाधव आणि शिक्षक-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभापती आंगोळकर पुढे म्हणाल्या की, “आजचा हा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा सोहळा त्यांना प्राथमिक शिक्षणाच्या पुढील प्रवासासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला खतपाणी घातल्यास त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल घडेल.”

कार्यक्रमात विधी समिती सभापती सुजाता बोराटे आणि नगरसदस्य राहुल जाधव यांनी देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शालेय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. महापालिका शाळांमधील बदलती गुणवत्ता आणि राबवले जाणारे उपक्रम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पूरक ठरत असल्याचा सूर यावेळी मान्यवरांच्या भाषणातून उमटला.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन धमेंद्र भांगे यांनी केले. आपल्या मुलांचा पहिल्या शैक्षणिक यशाचा हा सोहळा पाहून उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त केले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!