पर्यावरणपूरक इमारतींसाठी महापालिकेची ‘ग्रीन सवलत’; सामान्य करात मिळणार १० टक्क्यांपर्यंत सवलत
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १४ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील ज्या गृहनिर्माण संस्था किंवा इमारती कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि ‘झिरो वेस्ट’ संकल्पना प्रभावीपणे राबवतील, त्यांना सामान्य करात (General Tax) थेट सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पर्यावरण संवर्धनासोबतच नागरिकांना आर्थिक दिलासा देण्याच्या उद्देशाने कर आकारणी आणि कर संकलन विभागाने ही योजना जाहीर केली आहे.
महापालिकेने विविध निकषांनुसार सवलतीचे प्रमाण निश्चित केले आहे:
-
ऑनसाइट कंपोस्टिंग यंत्रणा (कचरा खत प्रकल्प) कार्यान्वित असल्यास: ५% सवलत
-
ऑनसाइट कंपोस्टिंग आणि एस.टी.पी (STP) प्लँट दोन्ही असल्यास: ८% सवलत
-
केवळ एस.टी.पी (STP) प्लँट कार्यान्वित असल्यास: ३% सवलत
-
संपूर्ण ‘झिरो वेस्ट’ (शून्य कचरा) संकल्पना राबविल्यास: ८% सवलत
-
झिरो वेस्ट आणि एस.टी.पी प्लँट दोन्ही कार्यान्वित असल्यास: १०% सवलत
महापालिकेचे उप आयुक्त सचिन पवार म्हणाले की, “पर्यावरणपूरक उपाययोजना राबवणाऱ्या इमारतींना प्रोत्साहन देणे हा या सवलतींमागील मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी ही जीवनशैली स्वीकारल्यास शहरातील कचरा व्यवस्थापनावरील ताण कमी होण्यास मोठी मदत होईल.”
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, “पिंपरी चिंचवड शहराला ‘स्वच्छ, हरित आणि शाश्वत’ बनविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. या कर सवलतींच्या माध्यमातून ‘ग्रीन सिटी’चा संकल्प अधिक बळकट होईल आणि नागरिकांना पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्यास प्रेरणा मिळेल.”
शहरातील जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक इमारतींनी या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभाराव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

