पिंपरी चिंचवड महानगरपालिका गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १५ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षण व सामाजिक न्यायाचा विचार आत्मसात करून आजची युवा पिढी यशाची नवी शिखरे सर करत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातून प्रशिक्षण घेऊन सरकारी सेवांमध्ये रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढणे, ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. हे यशस्वी विद्यार्थी इतरांसाठी प्रेरणास्थान असून, महानगरपालिका अशा गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच पाठीशी राहील,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
महापालिकेच्या वतीने आयोजित सामाजिक समता सप्ताह व ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ च्या पाचव्या दिवशी, स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते विविध पदांवर निवड झालेल्या खालील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला:
-
अक्षय काळडोके (गट विकास अधिकारी – BDO)
-
सुमित कानडे (सहायक संचालक, महाराष्ट्र लेखा व वित्त विभाग)
-
दिनकर गायकवाड (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, नागपूर महानगरपालिका)
-
प्रतीक वाघमोडे (महसूल सहाय्यक)
-
कृष्णा लोखंडे (वरिष्ठ तांत्रिक सहायक, अन्न व औषध प्रशासन)
-
तनिषा गेगंजे (पोलीस शिपाई, पुणे शहर पोलीस)
-
सनी पोळ (पोलीस, पिंपरी चिंचवड शहर पोलीस)
-
पायल शेलार (पिंपरी चिंचवड शहर पोलीस)
-
पूजा तलारे (भुकरमापक, भूमी अभिलेख, पुणे)
-
ज्योती पानमंद (पुरवठा निरीक्षक)
-
रणजित दाभाडे (लिपिक)
याप्रसंगी बोलताना महापौर म्हणाले की, स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शनच नव्हे तर योग्य दिशा, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन मिळत आहे. आगामी काळात या केंद्रातील सुविधा अधिक सक्षम करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने शहराचे नाव उंचावले असून, त्यांच्या या यशातून नवीन विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



