पिंपरीत ‘काव्यशायराना’ आणि ‘महासंगीत रजनी’तून समतेचा जागर; वसीम बरेलवी यांच्या शायरीने तर आदर्श शिंदेंच्या आवाजाने रसिक मंत्रमुग्ध
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १५ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: शब्द, सूर आणि विचारांच्या त्रिवेणी संगमाने पिंपरीतील ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ ची संध्याकाळ सुवर्णमयी ठरली. प्रख्यात उर्दू शायर वसीम बरेलवी यांची हृदयस्पर्शी शायरी आणि सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे व वैशाली सामंत यांच्या दमदार आवाजातील भीमगीतांनी पिंपरीकरांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित सामाजिक समता सप्ताह आणि विचार प्रबोधन पर्वाचे.
पिंपरी येथील भीमसृष्टी परिसरात महात्मा फुले यांची द्विशताब्दी जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती वर्षानिमित्त या विविधरंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सत्रात झालेल्या या सोहळ्याला नागरिकांनी विक्रमी गर्दी केली होती.
काव्यमैफलीचे मुख्य आकर्षण असलेले जगप्रसिद्ध शायर वसीम बरेलवी यांनी आपल्या सादरीकरणातून प्रेम, वेदना आणि मानवी मूल्यांची गहिरी जाण रसिकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या प्रत्येक शेर-ओ-शायरीला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांच्यासोबतच प्रणय सतलज यांनी तरुणाईच्या भावविश्वातील संघर्ष मांडला, तर संदीप जगताप यांनी सामाजिक भान जपणाऱ्या कविता सादर केल्या. विशाल उशीरे यांनी आपल्या ऊर्जावान शैलीतून आधुनिक नातेसंबंधांचे वास्तव मांडले.
रात्रीच्या सत्रात झालेल्या ‘लाईव्ह कॉन्सर्ट – महासंगीत रजनी’ने पिंपरीत भारावलेले वातावरण निर्माण केले. लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांनी आपल्या दमदार आवाजात भीमगीतांचे सादरीकरण केले. स्वाभिमान आणि परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या या गीतांवर रसिक श्रोते थिरकले. उत्कृष्ट प्रकाशयोजना आणि लाईव्ह ऑर्केस्ट्राची जोड मिळाल्यामुळे ही संगीतमय रात्र अविस्मरणीय ठरली.
कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू ठरला तो रात्री १२ वाजताचा क्षण. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे स्वागत करण्यासाठी आकाशात भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भीमगीतांच्या पार्श्वसंगीतात आणि रोषणाईने न्हाऊन निघालेल्या आकाशाने उपस्थितांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण केली. या उपक्रमातून समतेचा आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



