news
Home पिंपरी चिंचवड ‘सेवा परमो धर्म’! पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय अग्निसुरक्षा सप्ताहाचे आयोजन

‘सेवा परमो धर्म’! पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय अग्निसुरक्षा सप्ताहाचे आयोजन

शहीद विशाल जाधव यांच्या शौर्याचे स्मरण; आठवडाभर शाळा, रुग्णालये आणि सोसायट्यांमध्ये रंगणार मॉक ड्रील्स | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अग्निशमन विभाग नागरिकांना तत्पर आणि प्रभावी सेवा देण्यासाठी सज्ज; उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांचे प्रतिपादन

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १४ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे. आपत्ती व्यवस्थापनात प्रतिबंध, पूर्वतयारी आणि तात्काळ प्रतिसाद या त्रिसूत्रीचे पालन केल्यास जीवित व मालमत्तेचे नुकसान टाळता येते. अग्निशमन दलातील जवानांना समाजसेवेची एक मोठी संधी मिळाली असून, ते आपले कर्तव्य चोख बजावण्यासाठी सज्ज आहेत,” असे प्रतिपादन उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या वतीने १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय अग्निसुरक्षा सप्ताहा’ची सुरुवात संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशमन केंद्रात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी शहीद अग्निशमन जवानांना पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी २०१९ मधील दापोडी दुर्घटनेत शहीद झालेले अग्निशमन कर्मचारी विशाल जाधव यांच्या शौर्याचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या बलिदानाचा अग्निशमन विभागाला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

याप्रसंगी मुख्य अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, उप अग्निशमन अधिकारी चंद्रशेखर घुले, गौतम इंगवले, दिलीप गायकवाड, अनिल डिंबळे, श्रीकांत वैरागळ, सुनील फरांदे यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये शहरातील महानगरपालिका कार्यालये, पोलीस स्टेशन, रुग्णालये, शाळा आणि रहिवासी सोसायट्यांमध्ये अग्निशमन विभागाच्या वतीने विशेष प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके (Mock Drills) आयोजित केली जाणार आहेत. यातून नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण केली जाईल.


अग्निशमन सप्ताहाचे औचित्य साधून ‘दि महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस पर्सोनेल वेल्फेअर असोसिएशन’साठी निधी संकलन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी हा निधी वापरला जातो. उपायुक्त दुर्वास यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले आणि ‘सेवा परमो धर्म’ या भावनेतून सर्वांना योगदान देण्याचे आवाहन केले. यामुळे कर्मचाऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!