news
Home पिंपरी चिंचवड पिंपरीत निळ्या पाखराची गगनभरारी! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर आकाशातून पुष्पवर्षाव

पिंपरीत निळ्या पाखराची गगनभरारी! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर आकाशातून पुष्पवर्षाव

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महामानवास अभिवादन; हेलिकॉप्टरद्वारे भीमरायावर पुष्पवृष्टी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आजच्या पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज; महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १४ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा विचार हा आपल्या संविधानाचा पाया आहे. त्यांनी दिलेला शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा मंत्र आजही समाजाला दिशा देणारा आहे. केवळ त्यांच्या विचारांचे स्मरण न करता, ते आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणणे हीच आजच्या पिढीसाठी काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस, तसेच भीमसृष्टी, एच. ए. कॉलनी आणि दापोडी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन, कुशाग्र कदम, डॉ. सुहास कांबळे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, माई काटे, वर्षा जगताप, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर लांडगे पुढे म्हणाले की, “क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा जागर करण्यासाठी महापालिकेने ११ ते १७ एप्रिल दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ आणि ‘विचार प्रबोधन पर्व’ आयोजित केले आहे. या उपक्रमातून समता आणि बंधुतेचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एकता कर्मचारी संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. पिंपरी येथील भीमसृष्टी परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली. आकाशातून होत असलेल्या या गुलाबाच्या फुलांच्या वर्षावामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, प्रशांत शितोळे, भाऊसाहेब भोईर आणि इतर मान्यवरांनी हेलिकॉप्टरमध्ये स्वार होऊन महामानवाला आकाशातून अभिवादन केले. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!