news
Home पिंपरी चिंचवड प्रशासनाच्या ‘दडपशाही’ विरोधात फेरीवाले रस्त्यावर! ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयावर धडक मोर्चा

प्रशासनाच्या ‘दडपशाही’ विरोधात फेरीवाले रस्त्यावर! ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयावर धडक मोर्चा

शिवराळ भाषा आणि भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; काशिनाथ नखाते यांचा आंदोलनाचा पवित्रा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

फेरीवाल्यांचे ‘ड’ प्रभागावर जोरदार आंदोलन; चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कारवाईचा विचारला जाब

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १७ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडून फेरीवाल्यांवर होत असलेल्या बेकायदेशीर आणि चुकीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज रहाटणी-काळेवाडी येथील कार्यालयावर विक्रेत्यांनी धडक मोर्चा काढला. “लढेंगे… जितेंगे…” आणि “बेकायदेशीर कारवाईचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

नॅशनल हॉकर फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे हे आंदोलन करण्यात आले.

कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी यावेळी प्रशासनावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “महानगरपालिका फेरीवाला कायद्याची (Street Vendors Act) अंमलबजावणी न करता जाणीवपूर्वक गोरगरीब विक्रेत्यांना लक्ष्य करत आहे. एकीकडे अनधिकृत आठवडे बाजारांना संरक्षण दिले जाते, तर दुसरीकडे प्रामाणिक विक्रेत्यांना कारवाई दरम्यान हीन वागणूक देऊन शिवराळ भाषा वापरली जात आहे. अधिकारी ठराविक लोकांवरच कारवाई करून त्यांचे आर्थिक नुकसान करत आहेत.”

विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, पालिकेकडून अधिकृत प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. “स्टॉल आणि हातगाड्या स्वतःहून काढून घ्या, अन्यथा तीन दिवसात जप्त करू,” असा दम अधिकाऱ्यांकडून दिला जात होता. या जाचाला कंटाळून सर्व विक्रेते आज एकत्र आले.

या आंदोलनात पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, शैलेंद्र गाडे, लक्ष्मण शेरखाने, इरफान चौधरी, सागर कापूरे, मनोज रुपनवर, सुनील भोसले, संतोष बनगर, राजेश माने, नंदू आहेर, रवींद्र गायकवाड, सुषमा शेगावकर, स्वाती दिलापाक, ज्योती ढाकरे, अनाया सावंत, विशाल इचके, सखाराम केदार, लाला राठोड, अशोक पगारिया, झरीना शेख, अंबालाल सुखावल यांसह मोठ्या संख्येने विक्रेते सहभागी झाले होते.

आंदोलनानंतर शिष्टमंडळाने क्षेत्रीय प्रभारी अधिकारी पूजा दुधनाळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी सांगितले की, “कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त यांच्यासोबत लवकरच बैठक घेणे आवश्यक आहे. भाकर झोनच्या जागांबाबत सकारात्मक विचार केला जाईल आणि लवकरात लवकर तोडगा काढला जाईल.”

कायद्याची योग्य अंमलबजावणी न झाल्यास आगामी काळात महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा काशिनाथ नखाते यांनी यावेळी दिला.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!