पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित प्लॉगाथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; शहर स्वच्छतेचा संदेश कृतीतून साकार
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ कोयनानगर येथे आयोजित करण्यात आलेला ‘प्लॉगाथॉन’ उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. धावता धावता कचरा संकलन करण्याच्या या अभिनव उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला.
हा उपक्रम महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली यशस्वीपणे राबवण्यात आला.
या उपक्रमात उपायुक्त संदीप खोत, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, सहायक आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर यांच्यासह परिसरातील सुमारे २५० ते ३०० नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवला. उपस्थितांनी कोयनानगर परिसरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणचा कचरा गोळा करून परिसर चकाचक केला.
या मोहिमेत शहरातील अनेक नामवंत संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला, त्यामध्ये:
-
शैक्षणिक संस्था: गणगे प्रशाला, राजर्षी शाहू विद्यालय, गणेश इंटरनॅशनल स्कूल, विद्याव्हेली कॉलेज, डी. वाय. पाटील कॉलेज, दामोदर हरी चापेकर आयटीआय कॉलेज.
-
सामाजिक व फिटनेस गट: ओमसाई फिटनेस क्लब, सुप्रभात ज्येष्ठ नागरिक संघ, आदर्श क्रांती सामाजिक संस्था, सिद्धेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ, जॉगर्स पार्क ग्रुप, भगवती बचत गट.
“अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होत आहे. पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवण्याच्या दिशेने खंबीरपणे वाटचाल करत आहे,” असे मत उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी व्यक्त केले.
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची बांधिलकी आहे, हा संदेश या प्लॉगाथॉनच्या निमित्ताने अधोरेखित झाला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


