शहरातील वायू प्रदूषणावर लगाम घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मोठी कारवाई!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्रकल्पांमधून होणाऱ्या धूळकणांच्या प्रदूषणाबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत, पर्यावरण विभागाने धडक मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या १४ आरएमसी प्रकल्पांना सील ठोकले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) ऑक्टोबर २०२५ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शहरातील एकूण २२ आरएमसी प्रकल्पांची सखोल पाहणी केली. या तपासणीत १४ प्रकल्पांमध्ये धूळ नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा नसणे, परिसरात पाण्याची फवारणी न करणे, कच्चा माल उघड्यावर साठवणे आणि शेड्सचा अभाव अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या. या त्रुटींमुळे हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे स्पष्ट झाल्याने हे प्रकल्प तात्काळ बंद करण्यात आले. उर्वरित प्रकल्पांना हवा गुणवत्ता निरीक्षण प्रणाली बसविण्याच्या आणि तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-
अंतर: शाळा, रुग्णालय, न्यायालयापासून २०० मीटर आणि निवासी भागापासून किमान ५० मीटर अंतर असावे.
-
आच्छादन: कच्चा माल, लोडिंग-अनलोडिंग आणि मिक्सिंग युनिट पूर्णपणे बंदिस्त असणे बंधनकारक आहे.
-
धुळीवर नियंत्रण: नियमित पाणी फवारणी, धूळ संकलन प्रणाली आणि टायर धुण्याची व्यवस्था अनिवार्य आहे.
-
वेळ: औद्योगिक क्षेत्राबाहेरील प्रकल्प सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच सुरू ठेवता येतील.
-
प्रदूषण मानके: पीएम १० व पीएम २.५ मानकांचे पालन करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य आहे.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी औद्योगिक आणि बांधकाम प्रकल्पांवर पुढील काळातही अशीच कडक पाळत ठेवली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविली जाईल.
“शहरातील वायू प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळविणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बांधकाम आणि औद्योगिक प्रकल्पांनी पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. कोणताही नियमभंग खपवून घेतला जाणार नाही.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
“आरएमसी प्लांट्सनी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे अनिवार्य आहे. आम्ही सातत्याने तपासणी मोहीम राबवून प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक नियंत्रण ठेवणार आहोत.”
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

