news
Home पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हातोड्यानंतरही पुन्हा बांधकाम! चिखलीतील ४ विकासकांवर अखेर फौजदारी गुन्हे

महापालिकेच्या हातोड्यानंतरही पुन्हा बांधकाम! चिखलीतील ४ विकासकांवर अखेर फौजदारी गुन्हे

दोनवेळा कारवाई करूनही काम सुरूच ठेवल्याने महापालिकेची कठोर भूमिका; 'फ' क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चिखलीत अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची खैर नाही; ४ विकासकांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २३ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: चिखली येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये अनधिकृत बांधकामे करणाऱ्या विकासक आणि बांधकामधारकांविरुद्ध पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आता थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार नोटिसा बजावून आणि दोनवेळा प्रत्यक्ष तोडक कारवाई करूनही बांधकाम सुरूच ठेवल्याने ४ अनधिकृत बांधकामधारकांवर एमआरटीपी (MRTP) ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देवभूमी हौसिंग सोसायटी, चिंचेचा मळा आणि अष्टविनायक चौक या परिसरात ही अनधिकृत बांधकामे फोफावली होती.

प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत २५ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित बांधकामधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. ही बांधकामे स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र विकासकांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने १८ मार्च २०२६ रोजी धडक मोहीम राबवून सुमारे ६०० चौ.मी. क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला होता.

पहिल्या कारवाईनंतरही संबंधितांनी पुन्हा त्याच ठिकाणी बांधकाम सुरू केले. यामुळे १६ एप्रिल २०२६ रोजी महापालिकेचे पथक पुन्हा एकदा कारवाईसाठी पोहचले. यावेळी ४ अनधिकृत बांधकामधारक आणि व्यावसायिकांनी महापालिकेच्या पथकाला प्रचंड विरोध केला. मात्र, प्रशासनाने या विरोधाला न जुमानता कारवाई पूर्ण केली. वारंवार होणारा हा कायद्याचा भंग लक्षात घेता, प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलले आहे.

क्षेत्रीय अधिकारी तथा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या आदेशानुसार, या ४ अनधिकृत बांधकामधारक व विकासकांवर एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरात अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना हा स्पष्ट इशारा दिला असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध अधिक तीव्रतेने मोहीम राबविली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!