महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा
पुणे/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, १३ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सहकारनगर येथील कामगार कल्याण भवनाच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे ध्वजारोहण गुणवंत कामगार महमंदशरीफ मुलाणी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी गुणवंत कामगार बाळासाहेब साळुंके, प्रा. सागर खळदकर, उद्धव रामसने, प्रमोद जोशी आणि कामगार कल्याण सहआयुक्त मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मनोज पाटील यांनी उपक्रमाची भूमिका मांडली. त्यानंतर बाळासाहेब साळुंके यांनी ‘बदलते कामगार कायदे’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. बदलत्या कायद्यांमुळे कामगारांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात महमंदशरीफ मुलाणी यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान दिलेल्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन केले. या चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, प्र. के. अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या साहित्यातून व पोवाड्यांतून केलेली जनजागृती आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यादरम्यान विविध खेळांमधील विजयी खेळाडूंचा पुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये सिराज मुलाणी, नंदकुमार धुमाळ, वसीम मुलाणी, पांडुरंग सुतार, यासिन शेख, रघुनाथ फेगडे, शकील मुलाणी आणि झहीर मुलाणी खेळाडूंचा समावेश होता:
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय थोरात यांनी केले, तर सुहास माने यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. कळंबे, श्री. जोशी, श्रीमती बाठे, श्रीमती पांगारे आणि प्रवीण श्रीवास यांसह मंडळाच्या सर्व केंद्रसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
