पीसीयू मध्ये फिडेल सॉफ्टटेक द्वारे ‘स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब’ सुरू – ज्ञानेश्वर लांडगे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १५ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, पुणे: “विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठात (PCU) नेहमीच विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांसोबत अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण प्रणालीमध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. त्या अंतर्गतच ‘स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब’ची स्थापना करण्यासाठी फिडेल सॉफ्टटेक कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार पीसीयूला ‘एआय सक्षम विद्यापीठ’ (AI Enabled University) बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे,” अशी माहिती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (PCET) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली.
आकुर्डी येथील ट्रस्टच्या मुख्य कार्यालयामध्ये पीसीयू आणि फिडेल सॉफ्टटेक कंपनी यांच्यामध्ये हा सामंजस्य करार (MoU) अधिकृतपणे करण्यात आला.
या कराराविषयी माहिती देताना ट्रस्टचे खजिनदार शांताराम गराडे यांनी सांगितले की, “पीसीयूमध्ये लवकरच फिडेल सॉफ्टटेक द्वारे ‘स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब सेंटर’ प्रत्यक्ष कार्यरत होईल. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध लाइव्ह प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार असून, उद्योग क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक साधनांद्वारे डेटा ॲनालिटिक्स, डेटा इंजिनिअरिंग आणि बिझनेस इंटेलिजन्सचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. या संपूर्ण उपक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नियमित प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, असाइनमेंट्स, मूल्यांकन आणि शेवटी अधिकृत प्रमाणपत्रांचा समावेश असणार आहे.”
या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डेटा ॲनालिटिक्स, डेटा इनजेशन आणि इटीएल (एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म, लोड) प्रक्रिया, प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मधील उच्च मागणी असलेल्या करिअरसाठी आवश्यक असणारी महत्त्वाची कौशल्ये विकसित करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वासही शांताराम गराडे यांनी व्यक्त केला.
या सामंजस्य करार सोहळ्याप्रसंगी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, आयटी आणि आयटीइएस विभाग प्रमुख प्रा. रामकृष्ण वडाली आणि फिडेल सॉफ्टटेक लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुनील कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत प्रा. रामकृष्ण वडाली यांनी केले, तर आभार ओ.एस.डी. डॉ. योगेश भावसार यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
